

नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा, अपूर्ण प्रकल्प आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी व कात्रज परिसरात पावसाळ्यातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि वाहतूकव्यवस्थेच्या मूलभूत सोयींचा अभाव नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरला आहे.
रवी कोपनर
प्रभाग क्रमांक 40 कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
प्रभागात समाविष्ट असलेल्या कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी आणि कात्रजचा भाग भौगोलिकदृष्ट्या चढ-उताराचा असल्याने वेळी-अवेळी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागात पाणी प्रश्न गंभीर आहे. शहरात सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत असताना भर पावसाळ्यात या भागात मात्र आठवड्यातून एक दिवसाचा क्लोजर ठेवण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणी प्रश्नाबाबत नागरिकांत नाराजीचा सूर आहे. शिवशंभोनगर, महादेवनगर, गोकूळनगर, सुखसागरनगर भाग 2 आणि येवलेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले नाही. डोंगर उतारावरील रस्त्यांवर पावसाळी लाइनची कामे झाली नसल्याने पावसाचे पाणी ड्रेनेज लाइनमध्ये जाऊन मैलायुक्त पाणी रस्त्यावरून वाहते. विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, अशा मूलभूत समस्या देखील पूर्णपणाने मार्गी लागलेल्या नाहीत. गोकूळनगर चौक ते अप्पर डेपो डीपी रस्त्याचे काम झाले नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, अनेक डीपी रस्ते विकासापासून वंचित आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावते. (Latest Pune News)
सुखसागरनगर रस्ता, शत्रुंजय मंदिर ते व्हीआयटी चौक रस्ता, खडी मशिन ते कोंढवा खुर्द आणि आंबेडकरनगर रस्त्यावर हातगाडी, पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. प्रभागातील काही प्रकल्प पूर्ण झालेले असताना ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले नसल्याने हे प्रकल्प केवळ शोभेच्या वास्तू ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा देखील अभाव आहे. मुख्य चौक, रस्ते अशा वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आलेले नसल्याने नागरिक विशेषतः महिलावर्गाची मोठी गैरसोय होते. कात्रज-कोंढवा मुख्य रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने मृतांच्या नातेवाइकांना धोकादायक पद्धतीने अंत्यसंस्कार करावे लागतात. गेल्या पाच वर्षांत कोंढवा बुद्रुक भागातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले. मात्र, कात्रजच्या भागातील ई-लर्निंग स्कूल, खेळाचे मैदान, हे दोन प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. तसेच, आरक्षित जागेवर नवीन प्रकल्प सुरू झाले नाहीत. त्यामुळे माजी नगरसेवकांनी कोंढवा बुद्रुक भागाच्या तुलनेत कमी लक्ष दिल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, शिवशंभोनगर, महादेवनगर, गोकूळनगर, सुखसागरनगर भाग 2, येवलेवाडी
कात्रज-कोंढवा रस्त्यालगत असलेली स्मशानभूमी तसेच या ठिकाणी सुविधांचा अभाव
कात्रज, कोंढवा परिसरात पाणी समस्या गंभीर असून, आठवड्यातून एक दिवसाचा क्लोजर
काही भागांत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम अद्यापही प्रलंबित
भैरोबा नाल्यात मैलायुक्त पाणी सोडले जात असून, सुरक्षा भिंतीचा प्रश्नही सुटला नाही
स्वामी विवेकानंद गार्डन ते अग्निशमन केंद्र विकास आराखड्यातील 30 मीटर रस्ता विकसित झाला नाही
खडी मशिन चौक ते ज्योती हॉटेल चौक यादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण रखडले
दशरथ मरळ चौक ते पुण्यधाम आश्रम रस्त्याचे रुंदीकरणही रखडले
गोकूळनगर चौक ते अप्पर डेपो डीपी रस्ता प्रलंबित
कात्रज-कोंढवा रस्त्याला समांतर असलेला डीपी रस्ताही रखडला आहे.
ई-लर्निंग स्कूल इमारतीचे कामही अर्धवट
यशश्री सोसायटीतील दोन एकर जागेवरील टिळेकर क्रीडांगण विकसित झाले नाही
शिवशंभोनगर परिसरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे
टिळेकरनगर येथील मुख्य 24 मीटर डीपी रस्ता विकसित
स्व. गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई
महापालिकेच्या ह.भ.प. पुंडलिक टिळेकर विद्यालयाची इमारत
येवलेवाडी येथे महापालिका शाळेच्या इमारतीचे काम सुरू
केएनके सोसायटी येथील ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू
छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बहुउद्देशीय हॉल
इस्कॉन मंदिराशेजारी पाच मजली वाहनतळ
येसाजी कामठे कुस्ती संकुल
विठ्ठल गेनुजी टिळेकर जलतरण तलाव
कै. सदाशिव ऊर्फ बापूसाहेब दरेकर शाळा आणि ई-लर्निंग शाळेचे (कात्रज) काम पूर्ण
स्वामी विवेकानंद उद्यानात विविध विकासकामे
पारगेनगर आणि स. नं. 24 येथे उद्यान विकसित केले तसेच शरद पवार उद्यानाचे नूतनीकरण
नव्याने विकसित होणारा भाग असल्याने पाणीटंचाईची समस्या मोठी होती. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत प्रभागात चार पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची कामे केली. पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 30 कोटींच्या विकास निधीतून अंतर्गत रस्ते, विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, पथदिवे, भाजी मंडई, व्यायामशाळा, मनपा शाळा इमारत, जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल आदी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले. डीपी रस्त्यांच्या विकासालाही चालना दिली.
रंजना टिळेकर, माजी नगरसेविका
येवलेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मेघडंबरी बसवली. डीपी रस्ते विकसित केले. माता रमाई आंबेडकर अग्निशमन केंद्र नव्याने सुरू केले. दवाखाना व आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू केले. गावठाण शाळा आणि ई-लर्निंग स्कूलचे (कात्रज) काम पूर्ण केले. बहुउद्देशीय हॉल बांधले. स्वामी विवेकानंद उद्यानात विविध विकासकामे केली. पारगेनगर आणि स. नं. 24 येथे उद्यान विकसित केले. महादेवनगर येथे पाण्याची टाकी बांधली. तसेच, प्रभागातील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, रस्ते काँक्रिटीकरण, पथदिवे, पावसाळी वाहिन्यांची कामे पूर्ण केली आहेत.
संगीता ठोसर, माजी नगरसेविका
पाच वर्षांच्या कार्यकाळात सुमारे 18 कोटींच्या विकासनिधीतून मूलभूत सोयी-सुविधा तसेच भाजी मंडई, व्यायामशाळा, मनपा शाळा इमारत, जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल या प्रकल्पांसह विविध विकासकामे मार्गी लावण्यात यश आले. शूरवीर येसाजी कामठे कुस्ती संकुलाचे कामही मार्गी लावले. भविष्यात शाळकरी विद्यार्थी व खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडांगण आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल उभारून नागरिकांना आरोग्य सुविधा करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
वीरसेन जगताप, माजी नगरसेवक
अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाइन, जलवाहिन्या, विद्युतलाइन भूमिगत करणे तसेच पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधांची कामे केली. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून भाजी मंडई, व्यायामशाळा, मनपा शाळा इमारत, जलतरण तलाव आणि बहुउद्देशीय हॉल आदी विकासकामांसाठी निधी मिळवून दिला. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी डीपी रस्त्यांच्या विकासासाठी पाठपुरावा केला.
वृषाली कामठे, माजी नगरसेविका