

Koregaon Park land purchase scam
बारामती : बारामतीत मी किंवा माझ्या नातेवाईकांनी काही संस्थांसाठी चुकीचे काम करून जमिनी घेतल्याचा आरोप काहींनी केला आहे. प्रत्यक्षात मी कधीही चुकीचे काम करत नाही. यासंदर्भात कोणाकडे कागदपत्रे असतील तर संबंधितांकडे तक्रार करावी, चौकशी व्हावी आणि दोषी असेल त्याच्यावर एफआयआर दाखल करावी, असे रोखठोक प्रतिपादन उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे केले.
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. तरीही खरेदी खत कसे काय होऊ शकते, हे मला आजपर्यंत कळाले नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, याप्रकरणी आता व्यवहार करताना ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल का नाही याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बोलले आहेत. पुण्यातील प्रकरणात निबंधकाने व्यवहाराची नोंदणी कशी केली? असे काय घडले की, त्याने चुकीचे काम केले हे चौकशीतून स्पष्ट होईल. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चांगल्या अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ते सत्यता तपासतील. त्यानुसार दोषींवर कारवाई होईल.
पुण्यातील प्रकरण माझ्या रक्ताच्या नात्याशी संबंधित असल्याने मी फक्त त्यासंबंधी बोलू शकतो. विरोधक इतर प्रकरणे पुढे आणत आहेत. त्यासंबंधी मला माहिती नाही. मात्र पुण्यातील प्रकरणातही चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. ज्या व्यवहाराचा कागदच होऊ शकत नाही, तेथे 300 कोटी आणि 1800 कोटी आकडे आले कसे, हा चौकशीचा भाग आहे. आता व्यवहार रद्द झाला असून चौकशीतून काय ते समोर येईल, असे पवार म्हणाले.
निवडणुका जवळ येताच आमच्यावर आरोप सुरू होतात. 2008-09 मध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला. कोणीही पुरावे देऊ शकले नाही. मी कालही चुकीचे काम केले नाही, आजही करत नाही आणि उद्याही करणार नाही. माझ्या नातेवाईकाने, सहकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने माझ्या नावे काही सांगितले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, चुकीचे काम करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.