

पुणे: पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी रांगेत न लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पंपावरील कामगारांनी मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी पेट्रोल पंपावरील चार कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
यश राजेंद्र पवार (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील राजेंद्र बाबूराव पवार (वय ५१, दोघे रा. कापडे बुद्रुक, पोलादपूर, रायगड) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, पेट्रोल पंपावरील कामगार
शिवराज अंबाराया गुत्ती (वय २३), जीवन महादेव कवे (वय २५, दोघे रा. अहिरे गाव, गणपती माथा, वारजे माळवाडी), संकेत धनाजी लंकेश्वर (वय २५, रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता), रितेश राजेंद्र गायकवाड (वय २२, रा. जय गणेश अपार्टमेंट, सह्याद्री शाळेजवळ, वारजे माळवाडी) यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास वारजे येथील शेल पेट्रोल पंपावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा मुलगा यश हा नवले उड्डाणपूल परिसरात राहायला होता. तो हिंजवडीला मित्रांकडे गेला होता. पहाटे घरी परतताना यश तीन मित्रांसोबत शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याला दुचाकी रांगेत लावण्यास सांगितले. त्यावरून त्याच्यामध्ये वाद झाला. आरोपी कर्मचाऱ्यांनी यश व त्याच्या मित्रांना प्लास्टिकचे स्टूल व कोनाने बेदम मारहाण केली. त्यामुळे यशला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, असे फिर्यादेत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा करत आहेत.
तक्रारदाराच्या आरोपावरून पंपावरील संबंधित चार कर्मचाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपावरील चित्रीकरण तपासण्यात आले असून, पुढील कारवाई केली जात आहे.
विश्वनाथ काईंगडे, वरिष्ठ निरीक्षक,वारजे माळवाडी