

येरवडा: पुणे महानगरपालिका हद्दीतील थकीत मिळकतकराची वसुली सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी 'मिळकतकर अभय योजना' पुन्हा लागू केली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना थकबाकीवरील दंडात ७५ टक्के सूट मिळणार असून, ही योजना १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. (Latest Pune News)
ही योजना लागू व्हावी, यासाठी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आमदारपदी निवड झाल्यापासून सतत पाठपुरावा केला. ११ डिसेंबर २०२४ रोजी तत्कालीन आयुक्तांना याबाबत लेखी विनंती केली होती. तसेच २५ फेब्रुवारी २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा ठळकपणे मांडला. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २२ फेब्रुवारी २०२५ व २२ सप्टेंबर, ४ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच शरदचंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही या विषयात लक्ष घालण्यासाठी विनंती केल्याचे पठारे यांनी सांगितले. ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेवर काढलेल्या धडक मोर्चातही हीच मागणी जोरदारपणे नोंदवली होती.
योजना अंमलात येत असल्याबाबत समाधान व्यक्त करत आमदार पठारे म्हणाले, मिळकतकर थकबाकी ही नागरिकांसाठी आर्थिक ताणाची बाब होती. अभय योजना पुन्हा सुरू व्हावी ही मागणी मी राज्य शासन व प्रशासनासमोर सातत्याने मांडली. या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि महानगरपालिका आयुक्त यांचे मन:पूर्वक आभार.
महापालिकेकडे कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे, बँका आणि ऑनलाइन व्यवहार यांसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी निर्धारित कालावधीत योजनेचा लाभ घेऊन थकबाकी नियमित करावी, असे आवाहन पठारे यांनी केले आहे.