

पुणे: वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या शहर वाहतूक शाखेतील दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून हा प्रकार समोर आला. दरम्यान, चौकशीनंतर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले.
पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि लक्ष्मण बालाजी रामगडे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही सहकारनगर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल रोजी हवालदार पवार आणि अंमलदार रामगडे यांची शारदा आर्केड चौकात नियुक्ती करण्यात आली होती. चौकात सिग्नल तोडणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला थांबवून एका वाहनचालकाकडून 150 रुपये, दुसऱ्याकडून 150 रुपये आणि आणखी एका वाहनचालकाकडून 200 रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम अधिकृत दंडाऐवजी थेट स्वीकारल्याचा आरोप आहे.
अजूनही काही ठिकाणी घोळक्याने थांबून करतात कारवाई
शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिस चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला थांबून घोळक्याने कारवाई करतात. यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवावी. चौकाच्या बाजूला उभे राहून केवळ नियमभंग करणाऱ्यांना पकडण्याची पद्धत आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. तरीही काही ठिकाणी हीच पद्धत सुरू असल्याचे समोर येत आहे.