

सुवर्णा चव्हाण
पुणे: अपघातात पाय गमावलेल्या अमित यांचे आयुष्य अंधकारमय झाले होते. कृत्रिम पाय बसविण्याचा खर्च ऐकून ते हतबल झाले. मात्र, मोफत कृत्रिम पाय बसवून देणाऱ्या उपक्रमाची माहिती मिळताच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. अवघ्या आठवड्यात त्यांना अत्याधुनिक मॉड्युलर पाय बसवून देण्यात आला, तोही पूर्णपणे मोफत. आज अमित स्वतःच्या पायावर चालत असून, आत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. ही कहाणी केवळ अमित यांची नाही, तर भारत विकास परिषदेच्या या उपक्रमातून हजारो दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय मिळाले असून, त्यांच्या आयुष्याला नवी उभारी मिळत आहे.
कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. पण, भारत विकास परिषदेच्या उपक्रमामुळे दिव्यांगांना मोफत मॉड्युलर प्रकारचे कृत्रिम हात-पाय तयार करून दिले जातात. तर, परिषदेच्या विविध शाखाही या उपक्रमावर तेवढ्याच ताकदीने काम करीत आहेत. बीव्हीपी साऊथ पुणे चॅरिटेबल ट्रस्टकडून ‘स्वनिर्भर दिव्यांग हेल्प अँड रिहॅबिलिटेशन : स्व-आधार’ केंद्र सहकारनगर येथे चालविले जात आहे. त्याद्वारेही देशभरातील दिव्यांगांसाठी मॉड्युलर स्वरूपातील हात-पाय तयार केले जात आहेत.
आत्तापर्यंत 500 दिव्यांगांनी याचा लाभ घेतला आहे. या केंद्रात प्रत्येक व्यक्तीच्या मापानुसार आणि गरजेनुसार कृत्रिम अवयव तयार केले जातात. हे अवयव हलके, मजबूत आणि वापरण्यास सोपे असल्यामुळे दिव्यांगांना चालणे, दैनंदिन कामे करणे सहजशक्य होत आहे. एक कृत्रिम हात-पाय तयार करण्यासाठी सुमारे दोन ते तीन दिवस लागतात. साधारणपणे पायाचा खर्च 12 हजार रुपये आणि हाताचा खर्च 5 हजार रुपये असला, तरी सीएसआर निधी आणि देणग्यांच्या माध्यमातून हा खर्च उचलला जातो. त्यामुळे लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक भार सहन पडत नाही. याशिवाय कृत्रिम हात-पायात बिघाड झाला, तर त्याची दुरुस्ती आणि ते बदलून देण्याची प्रक्रियाही मोफत पुरविण्यात येते.
याविषयी स्व-आधार केंद्राचे प्रमुख जयंत जेस्ते म्हणाले, कृत्रिम हात-पायासाठी येणारा खर्च मोठा असल्याचे लक्षात घेऊन परिषदेने मोफत कृत्रिम हात-पाय उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू केली. आज देशभरातील 13 शाखांमार्फत हे कार्य सुरू आहे, तर पुण्यात कर्वे रस्त्यासह सहकारनगर येथील स्व-आधार केंद्रावर मॉड्युलर पद्धतीचे हात-पाय बनवून ते देशभरातील दिव्यांगांना उपलब्ध करून दिले जातात. केंद्र संयोजक म्हणून अनिरुद्ध पाटणकर हे काम पाहतात. मोफत अवयव मिळाल्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास आम्हाला पुढे काम करण्याची प्रेरणा देतो.
...ही आहे कृत्रिम हात-पाय देण्याची प्रक्रिया
सुरुवातीला ठिकठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रिम हात-पाय बसवून देण्यासाठीचे शिबिर आयोजित केले जाते. शिबिराच्या पहिल्या टप्प्यात दिव्यांगांच्या पायांची मापे घेतली जातात, दुसऱ्या टप्प्यात त्यांना तयार अवयव बसवून देऊन प्रशिक्षण दिले जाते. ही महिनाभर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ कृत्रिम अवयव देणेच नव्हे तर दिव्यांगांना शासकीय योजनांची माहिती देण्याचे कामही संस्थेकडून केले जात आहे. स्व-आधार केंद्र हे सहकारनगर क्रमांक 1 येथील जयंतराव टिळकनगरमधील गणेशदत्त सोसायटीमध्ये 1/अ आदित्य बंगला येथे आहे.