

खेड: करंजविहिरे-पाईट (ता. खेड) ते तळेगाव स्टेशन (ता. शिरूर) असा 63.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 157 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, हा रस्ता बनवताना ठेकेदार रस्त्याच्या आधारासाठी (सब-बेस) काळी-लाल माती टाकत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
वाफगाव, गुळाणी, राजगुरुनगर, दोंदे, कडूस, पाईट अशा मोठ्या गावांतून जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने नियम डावलले आहेत. प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी आशियाई विकास बँकेने राज्य सरकारला 157 कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या खाली सब-बेस करण्यासाठी ठेकेदार थेट लगतच्या एका तलावातील लाल-काळी माती उकरून टाकत आहेत. वरून थोडासा मुरूम टाकून ’सब-बेस तयार’ असल्याचे सर्टिफिकेट घेत असल्याचे चित्र आहे.
पहिल्याच पावसात माती वाहून जाईल. अवजड ट्रक, कंटेनर आले की हा रस्ता वर्षभरात खड्डेमय होईल. 157 कोटींचा घोटाळा डोळ्यांसमोर घडत असून, त्यावर कोणी बोलायलाच तयार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग््राामस्थांनी दिली आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने काही ग््राामपंचायत सदस्य, सरपंच आणि स्थानिक राजकीय नेत्यांना मलिदा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच रस्त्याच्या कामातील अनियमिततेवर एकही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. आम्ही बोललो तर गावचा रस्ताच बंद पडेल, असा धमकीवजा इशारा देण्यात आल्याचे एका सरपंचाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
या कामाचे पर्यवेक्षण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता श्रीमती गिरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार फोन केला असता, एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकारी-ठेकेदारातील मिलीभगतमुळे हा रस्ता 2-3 वर्षांतच खचण्याची शक्यता ग््राामस्थांनी व्यक्त केली. रस्त्याच्या कामासाठी टाकलेला मातीचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून जाणार आणि अवजड वाहतुकीमुळे काँक्रीट फुटणार. मग पुन्हा ’दुरुस्ती’च्या नावाने नव्याने कोट्यवधींचे काम काढले जाणार, हा सगळा खेळ डोळसपणे सुरू आहे.
अपघाताचा धोका
काँक्रीट करण्यासाठी ठेकेदाराने अर्धा रस्ता खोदून ठेवला आहे. पाच ते दहा फू ट खोल असलेल्या अर्ध्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी निदर्शनास येईल असे फलक लावणे गरजेचे असताना त्यातही टाळाटाळ केली आहे.