

सासवड: मार्गशीर्षमध्ये फुलांना मोठी मागणी असते. गराडे (ता. पुरंदर) येथील प्रगतशील फूल उत्पादक शेतकरी किरण सुरेश तरडे व कुटुंबांना बिजली, ॲस्टरच्या फुलशेतीतून त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण सुगंध दरवळतोय. केवळ एक एकरात या कुटुंबाने गेल्या 15 दिवसांत दोन लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
फूल उत्पादकांसाठी गणपती, दसरा, दिवाळी व त्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना व लग्नसराई हा महत्त्वाचा हंगाम मानला जातो. यामध्ये यंदा दसरा, दिवाळी व गणपती या काळात पावसाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऐन फूलतोडणीच्या हंगामात व सणासुदीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. मात्र, याची कसर मार्गशीर्ष महिन्यातील हंगामात निघत आहे.
सध्या या फुलांना प्रतिकिलो 100 ते 150 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान असल्याचे फूल उत्पादक शेतकरी किरण तरडे यांनी सांगितले. या महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा मोठ्या प्रमाणावर उत्सव ग््राामीण भागात व शहरी भागात घरोघरी महिलांकडून केला जातो. यामुळेच या काळात फुलांना चांगली मागणी राहते. गुलटेकडी (पुणे), मुंबई येथील फूल मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढलेली आहे. बिजली, ॲस्टरच्या फुलांचे भाव प्रतिकिलोला अगदी दुपटीने वाढले आहेत. ॲस्टरच्या फुलांना प्रतिकिलोला भाव 150 रुपये मिळत आहे.
पारंपरिक पद्धतीने पुरंदर तालुक्यात विविध फुलांची शेती केली जाते. त्यामध्ये बिजली ह्या पारंपरिक फुलांची शेती अजूनही काही शेतकऱ्यांकडून केली जाते. पावसाळ्यातील खरीप हंगामात फुलांच्या रोपांची लागवड केल्यानंतर अडीच महिन्यांनी फुले काढणीस येतात. सध्या बिजली आणि ॲस्टरच्या फुलांची काढणी सुरू आहे. ॲस्टर उत्पादक शेतकरी किरण तरडे यांना बंधू विजय तरडे, पत्नी सुवर्णा तरडे आणि परिवाराची मोलाची साथ असते.
मार्गशीर्ष महिन्यात फुले तोडण्यास येण्यासाठी साधारणतः ऑगस्ट महिन्यात फुलांची लागवड करावी लागते. मात्र, या काळात सततच्या पावसाने लागवडीसाठी वापसायोग्य जमिनी नसल्याने लागवडी कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी लागवडी करूनही पावसाने खराब झाल्याने फुलांतून चांगले दिवस पुढील काळात येतील.
शांताराम भोराडे, फूल उत्पादक, सोमर्डी
पुरंदर तालुक्यात 705.65 हेक्टरवर फुलशेतीची लागवड झाली आहे. गराडे, सोमर्डी, चांबळी, बोपगाव, शिवरी, पोंढे येथील शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. पुणे फूलमार्केट जवळ असल्याने चांगला दरदेखील मिळत आहे. त्यात प्रामुख्याने बिजली, शेवंती, ॲस्टर, गुलाब व सोनचाफा लागवडीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे.
श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर