

खडकवासला: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी एक लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे स्टेनलेस स्टीलचे ‘फायर पर्पज नोजल’ हस्तगत केले असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली.
नांदेड सिटीमधील ‘सूर’ बिल्डिंगमधून चोरट्याने अग्निशमन वापराचे मौल्यवान स्टेनलेस स्टील नोजल चोरून नेले होते. याप्रकरणी उमेश शिंदे यांनी फिर्यादी दिल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यान्वित करण्यात आले. तपासादरम्यान नांदेड सिटीच्या सुरक्षारक्षकांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यासमुनी पाल (रा. उत्तमनगर) याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेले एक लाख 99 हजार 500 रुपये किंमतीचे नोजल जप्त केले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कसबे आणि कॉन्स्टेबल नीलेश कुलथे आदींनी ही कामगिरी केली.