

वेल्हे: पुणे शहर व परिसरास तसेच जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 49. 84 टक्के इतका पाणीसाठा आहे. उन्हाळ्याची तीवता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे.
गेल्या महिन्यात 27 फेबुवारी रोजी धरण साखळीत 17.96 टीएमसी इतका पाणीसाठा होता. शेतीचा पाणीपुरवठा कालवाफुटीमुळे बंद आहे. पुणे शहरास पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. महिनाभरात पाणीसाठ्यात जवळपास 3.50 टीएमसी पाण्याची घट झाली आहे. शुक्रवारी (दि. 27) धरणसाखळीत 14.53 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण साखळीत तब्बल एक टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या वर्षी 27 मार्च रोजी धरणसाखळीत 13.60 टीएमसी म्हणजे 46.65 टक्के इतका पाणीसाठा होता.
सध्या मगरपट्टा येथे कालवा फुटल्याने शेतीचा पाणीपुरवठा बंद असला तरी दोन दिवसांत कालव्याची दुरुस्ती करून शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. दौड, हवेली, इंदापूर आदी तालुक्यांतील 66 हजार हेक्टर शेतीला पाण्याचा लाभ होणार आहे. आगामी तीन महिन्यांत पिण्यासाठी तसेच जिल्ह्यातील शेती व लाखो रहिवाशांना योग्य नियोजन करून पाणी सोडले जाणार आहे.
जलसंपदा विभागाने जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. टेमघर, वरसगाव व पानशेत या धरणांतील पाण्यावर पुणेकरांसह जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांची तहान भागवली जाते. टेमघर मध्ये 14.99 पानशेतमध्ये 61.32 टक्के, तर वरसगाव मध्ये 51.21 टक्के पाणी शिल्लक आहे. या तीन धरणांतून मागणीप्रमाणे खडकवासला धरणात पाणी सोडले जात आहे. त्यानुसार खडकवासलातून पाणीपुरवठा केला जात आहे.
एक महिन्यात 3.50 टीएमसीची घट
खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मागील एक महिन्यात जवळपास 3.50 टीएमसी घट झाली आहे. चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीची पाणीसाठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे.