

खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाट माथ्यासह पानशेत-मुठा-मोसे खोऱ्यात शुक्रवारी पहाटेपासून अतिवृष्टी सुरू असल्याने खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत पाण्याची वेगाने वाढ होत आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येत असलेला विसर्ग सायंकाळी पाच वाजता ९३७२ क्युसेक करण्यात आला. दरम्यान, धरणसाखळीत २३.४२ टीएमसी म्हणजेच ८०.३५ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणसाखळीची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
गेल्या वर्षी २४ जुलै रोजी धरणसाखळीत २३.६० टीएमसी म्हणजे ८०.९८ टक्के साठा होता. गेल्या २४ तासांत टेमघर येथे १७७ मिलिमीटर, वरसगाव येथे १०३, पानशेत येथे १०८ व खडकवासला येथे २९ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत धरण ८४.८७ टक्के, तर वरसगाव ७८.७५ टक्के भरले आहे. येत्या दोन दिवसांत पानशेत परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या चार-पाच दिवसांत धरणसाखळी शंभर टक्के भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली.
धरणक्षेत्रातील जोरदार पावसामुळे गुरुवारी (दि. २३) संध्याकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत ४७०८ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तो ९३७२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. पानशेतही दोन दिवसांत भरून वाहण्याची चिन्हे आहेत . पावसाचे प्रमाण वाढल्यास मुठा नदीत जादा पाणी सोडावे लागणार आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यासह अधिकारी, धरणाचे शाखा अभियंता, कर्मचारी धरणावर तैनात आहेत. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, पाण्याची पातळी याची दर पंधरा मिनिटांनी माहिती घेतली जात आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी खडकवासलात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
चोवीस तासांत सव्वादोन टीएमसीची वाढ
गेल्या २४ तासांत धरणसाखळीत तब्बल सव्वादोन टीएमसी पाण्याची वाढ झाली. गुरुवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजता साखळीत २१.७० टीएमसी पाणीसाठा होता. पानशेत-वरसगाव-टेमघर खोऱ्यात सलग पाचव्या दिवशीही अतिवृष्टी सुरू आहे.