Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात गाठली शंभरी; दशकातील दुसरी सर्वांत लवकर तारीख

५ जुलैला १०० टक्के भरली धरणसाखळी; मुठा नदीत १,७१२ क्युसेक विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे: पुणे शहराची तहान भागविणार्‍या खडकवासला धरणसाखळीने यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा वेगाने शंभरी गाठली. ५ जुलै २०२६ रोजी धरणसाखळी १०० टक्के भरली असून, उपलब्ध दहा वर्षांच्या नोंदींमध्ये ही दुसर्‍या क्रमांकाची लवकरची तारीख ठरली आहे. यापूर्वी १ जुलै २०२२ रोजी धरणसाखळी पूर्णक्षमतेने भरली होती. त्यामुळे चार वर्षांनंतर यंदा पुन्हा धरणसाखळीने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात शंभरी गाठली आहे.

Khadakwasla Dam
Maharashtra Elephant Corridor: कर्नाटकातून आलेले हत्ती आता महाराष्ट्राचेच रहिवासी; कोल्हापूर-सिंधुदुर्गात सहअस्तित्वाचा प्रयोग

गेल्या काही वर्षांत खडकवासला साखळीतील धरणे लवकर भरली असल्याचे दहा वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यानुसार २०२४, २०२५ आणि २०२६ अशी सलग तीन वर्षे जुलै महिन्यातच धरणसाखळी पूर्णक्षमतेने भरली. यापूर्वी २०१७, २०१८ आणि २०१९ या सलग तीन वर्षांतही जुलैमध्येच धरणसाखळी भरली होती. मात्र, यंदाची ५ जुलैची तारीख या अलीकडच्या मालिकेतील सर्वांत वेगवान ठरली आहे. सन २०२२चा विक्रम अजूनही अबाधित असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१७ मध्ये २६ जुलै, २०१८ मध्ये १७ जुलै आणि २०१९ मध्ये ११ जुलै रोजी धरणसाखळी भरली. २०२० मध्ये मात्र १३ ऑगस्टपर्यंत धरणे पूर्ण भरली नव्हती. २०२१ मध्ये २२ जुलै आणि २०२२ मध्ये अवघ्या १ जुलैलाच धरणसाखळीने शंभरी गाठली. २०२३ हे याच्या अगदी उलट चित्र दाखविणारे वर्ष ठरले. त्या वर्षी धरणसाखळी ३० सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरली. त्यानंतर २०२४ मध्ये २७ जुलै, २०२५ मध्ये ८ जुलै आणि यंदा ५ जुलै अशी तारीख पुढे सरकत गेली.

Khadakwasla Dam
Maharashtra Librarians Salary: २५ वर्षे ज्ञानसेवा, तरीही तुटपुंजे मानधन; ग्रंथपालांची आर्थिक कोंडी

गेल्या दहा वर्षांत दोनदा 'जुलैच्या पहिल्या आठवड्यात'२०१७ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीतील आकडेवारी पाहता, धरणसाखळी भरण्याच्या तारखांमध्ये मोठी तफावत आहे. सर्वांत लवकर १ जुलै २०२२, तर त्यानंतर ५ जुलै २०२६ ही तारीख आहे. ८ जुलै २०२५ आणि ११ जुलै २०१९ या पुढील दोन लवकरच्या तारखा आहेत. यातून मान्सूनच्या पावसातील वर्षानुसार होणारा मोठा फरकही स्पष्ट होतो. गेल्या काही वर्षांत जून अखेरपासूनच दमदार पाऊस झाल्याने धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने वाढला; तर २०२३ मध्ये धरणे भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

सलग तीन वर्षांची दुसरी मालिका उपलब्ध नोंदींमध्ये २०१७ आणि २०१९ तसेच २०२४ आणि २०२६ अशा दोन वेळा सलग तीन वर्षे जुलैमध्ये धरणसाखळी भरल्याचे दिसते. मात्र, २०२४ ते २०२६ या मालिकेत धरणसाखळी अनुक्रमे २७ जुलै, ८ जुलै आणि ५ जुलै रोजी भरली. म्हणजेच या तीन वर्षांत धरण भरण्याची तारीख सातत्याने पुढे आली आहे. यंदाची ५ जुलैची शंभरी त्यामुळे केवळ पाणीसाठ्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर गेल्या दशकातील धरण भरण्याच्या पॅटर्नच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते.

Khadakwasla Dam
Swabhimani Shetkari Sanghatana Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १२ ठराव मंजूर

मुठेत १,७१२ क्युसेकचा विसर्ग

दोन दिवसांच्या तुरळक पावसानंतर मंगळवारी (दि. ११) दुपारपासून पानशेत-मुठा खोऱ्यात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. खडकवासला धरणसाखळी १०० टक्के भरली असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मंगळवारी दिवसभरात पानशेत येथे १०, तर टेमघर व वरसगाव येथे प्रत्येकी ६ आणि खडकवासला येथे ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने धरणसाठ्यात मंदगतीने पाण्याची आवक सुरू आहे.

Khadakwasla Dam
Indian Astronomers White Dwarf Discovery: अवघ्या ६ मिनिटांत एक फेरी; भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली दोन ‘मृत’ ताऱ्यांची विलक्षण जोडी

खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले की, धरणातील पाणीपातळी शंभर टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर सध्याच्या विसर्ग वाढविण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जात आहे. धरणे भरल्याने धरणक्षेत्रासह नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

या तारखांना धरणे लवकर भरल्याची नोंद

  • १ जुलै २०२२ : सर्वांत लवकर धरणसाखळी भरली.

  • ५ जुलै २०२६ : दुसर्‍या क्रमांकाची लवकरची तारीख.

  • ८ जुलै २०२६ : तिसरा क्रमांक.

  • ११ जुलै २०१९ : चौथा क्रमांक

  • २०२४-२६ : सलग तीन वर्षे जुलैमध्ये धरणसाखळी पूर्ण.

  • २०१७ आणि २०१९ : यापूर्वीही सलग तीन वर्षे जुलैमध्ये शंभरी

  • ३० सप्टेंबर २०२३ : उपलब्ध नोंदींतील सर्वांत उशिराची तारीख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news