

खडकवासला : पानशेत रस्त्यावरील ओसाडेत दुर्मिळ चौसिंगा हरणाची बंदुकीने गोळ्या घालून शिकार करणाऱ्या चौघांना न्यायालयाने शनिवार (दि. ३ जानेवारी) पर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
समीर वसंत पिलाणे, गणेश बबनराव लोहकरे (दोघे रा. ओसाडे, ता. राजगड), पांडुरंग दत्तात्रय कदम (रा. निगडे मोसे, ता. राजगड) व नवनाथ चंद्रकांत पवळे (रा. सोनापूर, ता. हवेली) अशी चार शिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड तपास करत आहेत.
ऐन नवीन वर्षाच्या तोंडावर रविवारी (दि.२८) ओसाडेतील जंगलात गस्त घालत असताना राजगड वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांना ओसाडेत दुर्मीळ चौसिंगा हरणाची शिकार करून त्याच्या मासांची वाटणी करत असताना रक्ताळलेल्या हातासह चौघे शिकारी सापडले.
राजगड वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, अतिशय निर्घृणपणे निष्पाप चौसिंगा हरणाला शिकाऱ्यांनी बंदुकीने गोळ्या घालून ठार मारले. ती बंदूक तसेच हरणाचे मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेली धारधार शस्त्रे जप्त केली आहेत.
चौघाही आरोपींना वन अधिनियम कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींच्या वनकोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली आहे.
शासनाच्या सुधारित वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार, चार शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समीर पिलाणे, नवनाथ पावले, गणेश लोहकरे व पांडुरंग कदम यांनी ओसाडेतील सरकारी घनदाट जंगलाशेजारच्या खासगी मालकी जंगलात चौसिंगा हरणाला मारले. वनरक्षक राजेंद्र निंबोरे यांच्या जागृतेमुळे आरोपी शिकार केलेल्या हरणाच्या मांसासह सापडले.
केंद्र व राज्य शासनाने वन्यजीव, वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे त्यासाठी सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलमाखाली वन्यप्राण्यांची निर्घृण शिकार करणाऱ्यास ७ वर्ष कारावास व २५ हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून दखलपात्र आहे.
घनदाट जंगलानी वेढलेल्या सिंहगड, तोरणा, राजगड, पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण खोऱ्यापासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत जवळपास दहा हजार हेक्टर सरकारी जंगल आहे. या परिसरात डोंगर, वृक्षांची बेसुमार कत्तल करून आलिशान बंगले, फार्महाऊस सोसायट्या, हाॅटेल, ढाब्यांचे मोठे जाळे पसरले आहे. भटक्या जमाती पर्यटनाच्या नावाखाली तसेच गावोगावच्या शिकाऱ्यांकडून होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर उभे आहे.