

पुणे : थेट घरातच दारू तयार करून त्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. भोसरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मद्यनिर्मितीसाठी वापरली जाणारी मशीन, बनावट सिलबंद बाटल्या, विविध ब्रँडचे देशी-विदेशी मद्य, बुचे, लेबल आणि वाहनासह २४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीला अटक केली आहे.
आकाश उबाळे असे अटक केलेल्याचे नाव आहे. अवैध मद्यनिर्मिती व विक्रीवर कडक कारवाई करत २७ डिसेंबर रोजी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भोसरी गाव परिसरातील शांतीनगर वसाहत येथे छापा टाकला. येथे उबाळे याच्या राहत्या घराची झडती घेतली असता मद्य सीलिंग मशीन, देशी दारू पॉवर पंच, टँगो पंच, मॅकडॉल, गोव्यात विक्रीसाठी असलेले एड्रील विदेशी मद्य, बनावट सिलबंद बाटल्या, काचेचे हायड्रोमीटर, गावठी हातभट्टी दारूने भरलेले ३५ कॅन, इलेक्ट्रिक फिलिंग मशीन, स्टेनलेस स्टील कंट्रोलर असा १२३ बाटल्यांसह मुद्देमाल आढळून आला. पुढे आरोपीच्या दिघी येथील दुसऱ्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला.
येथे व्हिस्कीच्या १११० बुचे, रॉयल स्टॅगच्या ३६५ बुचे, विविध ब्रँडचे एकूण १६५८ बुचे, २००० कागदी लेबल, इलेक्ट्रिक स्टेनलेस स्टील सिलिंग (कॅपिंग) मशीन, बनावट देशी-विदेशी मद्य तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरलेली टोयोटा इनोव्हा क्रिस्टा जप्त करण्यात आली. एकूण तीन ठिकाणी केलेल्या छापेमारीत एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासात आरोपीने घरातच बनावट देशी व विदेशी मद्य तयार करून त्याची विक्री सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अतुल पाटील, संदिप मोरे, दुय्यम निरीक्षक योगेश चव्हाण, प्रवीण ठाकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
छाटा टाकलेल्या घरात मद्यनिर्मिती मशीन, विविध महागड्या ब्रँडच्या दारूची डुप्लिकेट झाकणे आढळून आली आहेत. त्याने हा प्रकार कोणाच्या मदतीने केला आहे का, त्या दृष्टीने देखील पुढील तपास सुरू आहे.
अतुल कानडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे