

मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर शुक्रवार, दि. 9 जानेवारीपासून पुढील विकासकामांसाठी बंद राहणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मंदिर बंद होण्यापूर्वी दर्शन घ्यावे, या भावनेतून राज्यासह देशभरातून भाविक भीमाशंकमध्ये दाखल होत असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड गर्दीचे चित्र दिसून येत आहे.
भाविकांची संख्या वाढल्याने सर्व पार्किंगस्थळे पूर्णपणे भरली असून, अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहिल्याचे चित्र आहे. पार्किंगस्थळांपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी एसटी बससेवेची मोठी कमतरता जाणवत असून, अनेक भाविकांना पायी प्रवास करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना सहन करावा लागत आहे.
भीमाशंकर-घोडेगाव, मंचर तसेच इतर प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने भाविकांचा वेळ व संयम दोन्ही संपत चालले आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करत असले तरी अचानक वाढलेल्या गर्दीपुढे प्रशासनही काहीसे हातबल झाल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सुविधा, अपुरी बससेवा तसेच दर्शनासाठी लागणारा अधिक वेळ यामुळे भाविकांसह पोलीस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने योग्य नियोजन, अतिरिक्त बससेवा तसेच वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी आणि बससेवेच्या अभावामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन भाविकांना उत्तम सेवा द्यावी, असे गंगापूरचे उद्योजक रमेश येवले यांन सांगितले, तर दर्शनाची ओढ मोठी असली तरी पार्किंग व वाहतुकीचा गोंधळ अडचणी निर्माण करत आहे. प्रशासनाने अधिक चांगली व्यवस्था करावी, असे माजी जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर यांनी सांगितले.