

पिंपरी: लोहगड येथील केतन अगरवाल मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाल्यानंतर त्याचे वडील विशाल अगरवाल यांचा संयम सुटताना दिसत आहे. मुलाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या विशाल अगरवाल यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात न्यायाची अपेक्षा आहे. "न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलाच्या आत्म्याला तेव्हाच खरी शांती मिळेल," अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
केतनच्या मृत्यूनंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी हा अपघात असल्याचे मान्य केले होते. "घटनेनंतर केतनची होणारी पत्नी सिया गोयलने पाय घसरून दरीत पडल्यामुळे केतनचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्या वेळी घटनास्थळी ते दोघेच होते. आमच्यापैकी कोणीही तेथे नव्हते. त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवला. मात्र, एक-दोन दिवसांत काही बाबी समोर येऊ लागल्या. सांगितलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटना यामध्ये तफावत दिसू लागली. पोलिसांच्या हातीही काही संशयास्पद पुरावे लागले," असे विशाल अगरवाल यांनी सांगितले.
मुलाच्या लग्नाची तयारी करणारे हे कुटुंब आज शोकसागरात बुडाले आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विवाहासाठी घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू होती. कुटुंबातील प्रत्येक जण नव्या नात्याच्या स्वागतासाठी उत्सुक होता. मात्र, एका घटनेने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, केतनच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आल्या होत्या. "आम्हाला सियाबाबत चांगलेच सांगण्यात आले होते. जर तिचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम होते, तर ते स्पष्टपणे सांगता आले असते. कोणावरही लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रश्नच नव्हता. सत्य वेळेत समोर आले असते, तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती," असे ते म्हणाले.
केतनचा स्वभाव आणि निसर्गप्रेम आठवताना ते अधिकच भावूक झाले. "त्याला ट्रेकिंग आणि निसर्गाची खूप आवड होती. मात्र, तो बेफिकीर नव्हता. धोकादायक आणि निसरड्या जागेची त्याला पूर्ण जाणीव होती. तो अशा ठिकाणी निष्काळजीपणे जाईल, यावर आमचा विश्वास बसत नाही. निसर्गात कसे वावरायचे, कोणत्या ठिकाणी सावध राहायचे याची त्याला चांगली जाण होती," असे त्यांनी सांगितले.
मुलाच्या मृतदेहाचे दर्शन घेतल्यानंतर आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी कुटुंबीय अधिकच हादरले. "आमच्या मुलीला सुरुवातीपासूनच काही गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली एवढ्या धोकादायक आणि निसरड्या ठिकाणी जाण्याची गरज काय होती, हा प्रश्न आम्हाला सतावत होता. सुरुवातीपासूनच अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती," असेही त्यांनी नमूद केले.
विशाल अगरवाल यांनी म्हणाले, "पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा. या घटनेत आणखी कोणी सहभागी असेल, तर त्यांनाही आरोपी करावे. कोणालाही वाचवू नये. या कटात ज्यांचा सहभाग असेल, त्या प्रत्येकावर कारवाई व्हावी. माझ्या मुलासाठी मला फक्त न्याय हवा आहे."
आरोपी मुलीचे वडील रुग्णालयात दाखल
मावळ तालुक्यातील ऐतिहासिक दुर्ग असलेल्या लोहगडावरून होणाऱ्या पतीला ढकलून देऊन त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपी मुलीचे वडील प्रवीणकुमार गोयल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांना नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत त्रास जाणवू लागला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लोढा बेलमंडो सुन्न!
लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेल्या केतन अग्रवाल यांच्या मृत्यूला सुरुवातीला अपघात सांगितला. मात्र, पोलिस तपासात समोर आलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. बुधवारी (दि. २४) केतन राहत असलेल्या लोढा बेलमंडो परिसरात शोककळा कायम होती. दरम्यान, नेहमी गजबजलेली उच्चभ्रू सोसायटी दिवसभर गंभीर आणि सुन्न वातावरणात बुडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
केतन यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांची ये-जा सुरू होती. घराबाहेर उभे असलेले नातेवाईक एकमेकांकडे निःशब्द नजरेने पाहत होते. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. घरात प्रवेश करणारा प्रत्येक जण काय बोलावे आणि कोणाला धीर द्यावा, यानेच सुन्न झाला होता.
"हे काय झाले?" हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असल्याचे दिेसून आले.
काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या तयारीत व्यस्त कुटुंब अचानक या संकटात सापडल्याने नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला. साखरपुड्यानंतर दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना अचानक आलेल्या या घटनेमुळे धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
केतन यांच्या घरात दिवसभर शोकाकुल वातावरण होते. नातेवाईक आणि मित्रपरिवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या. काही महिला नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. तर तरुण मित्रमंडळीही कोपऱ्यात बसून आठवणींना उजाळा देताना दिसत होते. दरम्यान, पोलिस तपासात होणाऱ्या नव्या घडामोडींमुळे परिसरातही चर्चांना उधाण आलेे. सुरुवातीला अपघात सांगितलेल्या या घटनेमागे कट असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मी केतनला लहानपणापासून ओळखते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत. केतन अतिशय नम्र, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतः येऊन त्याचा विवाह ठरल्याची आनंदवार्ता सांगितली होती. होणाऱ्या पत्नीचे फोटोही मोठ्या उत्साहाने दाखवले होते. लग्नाच्या तयारीबाबत तो खूप आनंदी होता. त्यामुळे आज त्याच्याबाबत जे काही ऐकायला मिळते, त्यावर विश्वास ठेवणेही कठीण जात आहे. या घटनेने आम्हाला मोठा धक्का बसला आहे.
शशी अग्रवाल, शेजारी