

पुणे/कोंढवा: शहरात सुरू झालेल्या पावसामुळे बुधवारी (दि. 24) सकाळी प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचबराेबर शहरातील प्रमुख रस्त्यांवर चार ते पाच ठिकाणी गाड्या बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याबाबत नियंत्रण कक्षाला बुधवारी (दि. २४) दिवसभरात तक्रारीचे पंधरा कॉल प्राप्त झाले होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी तात्काळ उपायोजना करत क्रेनच्या साह्याने चारचाकी गाड्या रस्त्यातून बाजूला केल्या.
सकाळी सर्वांना वेळेत कामावर पोहाेचण्याची गडबड असते. अशातच शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील सकाळी ९ ते ११ च्या सुमारास वाहतुकीचा वेग मंदावला होता. पावसाळी वातावरण, सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे अनेक भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
यामध्ये खडी मशिन चौक, सोलापूर रोड, केसनंद गाव, टिळक चौक, खंडोजीबाबा चौक, केशवनगर मुंढवा चौक, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रोड, धानोरी जकात नाका, सिंहगड रोड श्री कंट्रोल चौक, पंधरा नंबर हडपसर, घोलेवस्ती काळेपडळ येथील परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाले होते. नियंत्रण कक्षाकडून तत्काळ संबंधित वाहतूक विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली. दरम्यान, सकाळपासूनच पाऊस सुरू असल्यामुळे अनेकांनी चारचाकी गाड्या बाहेर काढल्या होत्या. अशातच पाच ते सहा ठिकणी गाड्या बंद पडल्या. त्यामुळे मोठी कोंडी झाली.
वाहतूक पोलिसांनी माेठ्या कष्टाने ही वाहतूक कोंडी सोडवून रस्ता रिकामा केला. दुपारी १२ ते ३ दरम्यान शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक काहीशी सुरळीत झाली असली, तरी शिवाजीनगर, स्वारगेट, संगमवाडी, औंध आणि बाणेर परिसरात वाहनांचा वेग अतिशय कमी होता. सायं. ४ ते पावणे 7 दरम्यान बाणेर रोड, पॅन कार्ड क्लब रोड, वाकड, हिंजवडीकडे जाणारे मार्ग, औंध, विद्यापीठ चौक, गणेशखिंड रस्ता, कोथरूड, कात्रज चौक, सातारा रस्ता येथे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
खडीमशिन चौकात तीन तास कोंडी
कोंढवा बुद्रुक परिसरातील खडीमशिन मुख्य चौक व चौकाच्या आसपास पावसामुळे कंटेनर, बस, टेम्पो बंद पडल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे कात्रज, उंड्री, कोंढवा खुर्द व येवलेवाडी बाजूला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बुधवारी (दि. २४) सकाळी ८ लाच रिमझिम पाउस सुरू झाला. दरम्यान कोंढवा खुर्दकडून येणारी पीएमपी खडीमशिन मुख्य चौकात बंद पडली. खडीमशीन चौकातून बोपदेव घाटाकडे जाणारा कंटेनर चौकापासून 50 फुटांवर बंद पडला. तर उंड्रीकडून कात्रजकडे जाणारा टेम्पो चौकापासून काही अंतरावर बंद पडला. एकाचवेळी तीन वाहने बंद पडल्यामुळे काही क्षणात खडीमशिन चौक वाहतूक कोंडीने जाम झाला. स्थानिक नागरिकांनी देखील ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत केली.