

पुणे: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कान, नाक आणि गळा कापून निर्घृण खून केला. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाईवस्ती संतोष पठारे यांच्या लेबर कॅम्पमध्ये खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी, खराडी पोलिसांनी आरोपी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत किरण यांचा भाऊ दादु सजन बोरसे (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. २४) पहाटे चार वाजताच्या सुमारास येथील लेबर कॅम्पमध्ये घडली आहे.
आरोपी पती हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो. त्याची पत्नी किरण ही खराडी परिसरात घरकाम करते. बाबर दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यात वाद होत होते. बुधवारी (२४ जून) पहाटे किरण गाढ झोपेत होती. शेजारी मुले झोपली होती. आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने किरणचे नाक आणि कान कापले. पहाटेच्या वेळी मुलांना जेव्हा जाग आली, तेव्हा त्यांना आईच्या अंगावर रक्त दिसले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना ही माहिती दिली.
त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या किरणला भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खराडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पती पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.