

पुणे: 'बालगंधर्व रंगमंदिराच्या बुकिंगची पहिली पावती (क्रमांक ०००१) मेलडी मेकर्सच्या नावावर होती. १९६८ मध्ये रंगमंदिर सुरू होण्यापूर्वी सुहासचंद्र कुलकर्णी यांनी महापालिकेत जाऊन सर्वप्रथम बुकिंग केले होते. मात्र, आचार्य अत्रे यांच्या सूचनेनुसार रंगमंदिराची सुरुवात देव-संतांच्या नामस्मरणाने व्हावी, या हेतूने मेलडी मेकर्सला दिलेली पहिली तारीख पुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर पहिल्या आठवड्यात आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ नाटकाचे प्रयोग सादर झाले, त्यानंतर ‘संगीत मानापमान’, ‘संगीत स्वयंवर’ या नाटकांचेही प्रयोग झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी आमचा कार्यक्रम रंगमंदिरात झाला. सुरुवातीला रंगमंदिरात महिनाभर मेलडी मेकर्सची साउंड सिस्टिम वापरण्यात आली,’ अशा शब्दांत मेलडी मेकर्सचे सहसंस्थापक अशोककुमार सराफ यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणींना उजाळा दिला.
बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे महापालिका आणि अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या वतीने आयोजित केलेल्या महोत्सवात अशोककुमार सराफ यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार होते. उपमहापौर परशुराम वाडेकर, गायक आनंद शिंदे, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, अभिनेते सुशांत शेलार, अभिनेत्री वर्षा उसगावकर, ‘बालगंधर्व परिवार’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते. ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप, राज देशमुख, गायिका सावनी दातार-कुलकर्णी आदींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मेलडी मेकर्स वाद्यवृंदाच्या स्थापनेचा प्रवास उलगडत सराफ म्हणाले की, आपल्याला मिळालेला ‘जीवनगौरव’ पुरस्कार हा आपल्या एकट्याचा नसून, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. ‘मेलडी मेकर्स’ने देशातील सर्व राज्यांत आणि जगातील बहुतेक महत्त्वाच्या देशांमध्ये सादरीकरण केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराशी ‘मेलडी मेकर्स’चे जवळचे नाते आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याची आठवण पवार यांनी सांगितली. बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करताना कलाकार आणि रसिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे पुनर्विकास केला जाईल, याची ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास स्वागतार्ह आहे. कलाकार म्हणून आमच्याकडून त्याला कोणतीही आडकाठी नाही. आम्ही त्याला सहकार्य करू. मात्र, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास हा कलाकारांना विश्वासात घेऊन केला जावा.
मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, बालगंधर्व परिवार ट्रस्ट, पुणे