

पुणे : शाळेत मुले पाण्याची रिकामी बाटली सोबत बाळगतात. मुले चॉकलेट, चिप्सची पाकिटे बाटलीमध्ये टाकून प्लास्टिकचा कचरा टाळतात. भोर तालुक्यातील केळवडे आणि साळवडे या गावांमधील प्लास्टिकमुक्तीचा हा अनोखा पॅटर्न आता जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. भोर तालुक्यातील या दोन्ही गावांनी प्लास्टिकमुक्ती साठी टाकलेल्या पावलांनी गावामध्ये बदल घडत आहे. लहानग्यांच्या पुढाकारामुळे त्यांच्या पाठीमागे आपसूकच पालकमंडळी आली. गावातील ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला, प्लास्टिक व्यवस्थापनाची जोड दिली. या गावांमध्ये घडत असलेल्या बदलाची दखल जिल्हा परिषदेच्या मुुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी घेतली. त्यांनी हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या अधिकार्यांना सूचना केल्या. गाव सध्या प्लास्टिकच्या कचर्याचे प्रभावी व्यवस्थापन करत आहे. काही खासगी कंपन्यांच्या सीएसआरची या दोन्ही गावांना मदत झाली.
संबंधित बातम्या :
सध्या गावातील प्रत्येक घरामध्ये एक प्लास्टिकची पिशवी देण्यात आली आहे. त्यामध्ये घरातील सर्व प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात येतो. ग्रामपंचायतीकडूनही घराघरातून प्लास्टिकच्या कचर्याच्या पिशव्या गोळा केल्या जातात. त्यानंतर त्या पिशव्या एक स्वयंसेवी संस्था विल्हेवाटीसाठी घेऊन जाते. साळवडे गावात सुरू झालेला हा उपक्रम केळवडे गावातदेखील राबविण्यास सुरुवात झाली आणि त्या ठिकाणीदेखील प्लास्टिकमुक्तीसाठी गावकर्यांनी पुढाकार घेतला. मात्र, याची शालेय विद्यार्थ्यांकडून सुरुवात केल्याने त्यांच्याकडून प्रत्येक कुटुंबापर्यंत प्लास्टिकमुक्तीसाठीची जनजागृती होण्यासाठी मदत झाली.
कचर्याची बाटली दिल्यावर मिळते गिफ्ट
शालेय विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा कचरा भरलेली बाटली दिल्यानंतर त्यांना गिफ्ट देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये कधी मुलांना खाऊ मिळतो, तर कधी शालेयपयोगी वस्तू. त्यामुळे मुले इतरत्र टाकून देणारे प्लास्टिक न चुकता बाटलीमध्ये ठेवत असल्याचे ग्रामसेवक अभय निकम यांनी सांगितले.
प्लास्टिकमुक्त गावे करणे आवश्यक असल्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या दोन्ही गावांनी राबविलेला उपक्रम उपयोगी ठरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केळवडे आणि साळवडे या दोन्ही गावांचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे.
हेही वाचा :