कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लावणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लावणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
Published on
Updated on
कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने जुलैच्या पुरवणी मागणीत 200 कोटींची तरतूद केली असून, हा निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने होईल. वाहतूक नियोजनासाठी 175 वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. 14 बसथांबे, विद्युत खांब व ट्रान्सफॉर्मर मागे घेतल्यास एक लेन उपलब्ध होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह विविध विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत कात्रज-कोंढवा रस्त्यावरील विविध समस्यांची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेवक प्रकाश कदम आदी उपस्थित होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील विविध समस्या सोडवून रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा विश्वास या वेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक नियोजनासाठी 50 पोलिस कर्मचारी, महापालिकेकडून 100 वार्डन आणि जनसहभागातून 25 वार्डन देण्यात येणार आहेत. स्वतंत्र मोजणी व महावितरणचे अधिकारी उपलब्ध असतील. काही जागा मालकांनी यापूर्वी टीडीआर व एफएसआय घेऊन जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्या आहेत.
परंतु तरीही ते त्या जागांचा वापर करत आहेत. त्यांच्यावर तातडीने अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. रुंदीकरणाची गरज लक्षात घेता जागामालकांनी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे.' रुंदीकरणासाठी सर्वप्रथम स्वतःची जागा ताब्यात दिली असून, या ठिकाणी कामदेखील झाले आहे. तसेच, इतर जागामालकांना रुंदीकरणाचे महत्त्व पटवून देऊन जागा ताब्यात देण्याचे आवाहन केले असल्याचे या वेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले…

वाहतूक नियोजनासाठी 175 वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करणार
भूसंपादन, मोजणी व विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांची पूर्ण वेळ नियुक्ती
भूसंपादन होऊन जागेचा वापर करणार्‍यांवर होणार अतिक्रमण कारवाई
जागामालकांनी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी सहाकार्य करावे
भूसंपादनासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, जागामालकही पुढे येत आहेत. 50 मीटर रुंदीकरणातील सेवालाइन भूमिगत करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या सात दिवसांत दुरुस्तीसह रेलिंग व साईडपट्ट्यांची कामे पूर्ण होतील. तीन जागा ताब्यात आल्यास इस्कॉन मंदिर ते खडी मशीन चौकादरम्यानच्या मार्गावर जड वाहनांची पर्यायी वाहतूक एका महिन्यात होईल.
-विक्रम कुमार, 
आयुक्त, महापालिका.
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news