पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज चौकालगतच्या 40 गुंठे जागेचे भूसंपादन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 21 कोटी 57 लाख 60 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. बहुचर्चित कात्रज चौकाजवळ सर्व्हे नंबर 1/2 येथील जागा संजय गुगळे यांच्या मालकीची आहे. शहराच्या 1987 च्या विकास आराखड्यानुसार तीस मीटर डीपी रोड आणि पार्कसाठी 6 हजार 200 चौरस मीटरसाठी ही जागा बाधित होती.
त्यानंतर 2017 च्या विकास आराखड्यात हा रस्ता 30 मीटरऐवजी 60 मीटरचा करण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्ता आणि पुणे-सातारा रस्ता या दोन रस्त्यांमध्ये ही जागा बाधित होत आहे. या जागेबाबत संजय गुगळे हे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने महापालिकेस गुगळे यांना मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार संजय गुगळे यांची 40 गुंठे जागा 2013 च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादित करण्यात येणार आहे. या जागेच्या भूसंपादनासाठी पालिकेच्या पथ विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या भूसंपादनासाठी लागणारा 21 कोटी 57 लाख 60 हजार रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
ही जागा ताब्यात आल्यानंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरसाठी जागा लागणार आहे. जागा ताब्यात नसल्याने रखडलेले पुलाचे कामही जागा ताब्यात आल्यानंतर मार्गी लागणार आहे.
हेही वाचा