

पुणे: सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागेचा व्यवहार रद्द झाला आहे. आता बंद झालेले विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि मेस लवकर सुरू व्हावी, अशी मागणी जैन मुनी आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी केली. समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करून पाठिंबा दिल्याने हा व्यवहार रद्द झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
मॉडेल कॉलनी परिसरात तीन एकर भूखंडावर सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. मात्र, काही विश्वस्तांनी 230 कोटींचा व्यवहार करीत ही जागा खासगी बांधकाम व्यावसायिकाला दिली होती. याला जैन समाजाने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. या जागेचा वादग््रास्त व्यवहार येत्या पंधरा दिवसांत रद्द न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी दिला होता. अखेर न्यायालयाने हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
या पार्श्वभूमीवर आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जागेचा लढा मोठा होता. या लढ्यात आम्हाला सर्वांनी सहकार्य केले. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मी केलेल्या आवाहनाला साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे जागेचा व्यवहार रद्द झाला आहे. आता येथील बंद असलेले विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि मेस सुरू होणे गरजेचे आहे.
ट्रस्टींनी चुका केल्या आहेत, त्यांनी याचे प्रायश्चित्त करणे गरजेचे आहे. ट्रस्टींनी येथील वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन देऊन काम सुरू केले आहे. मात्र, वसतिगृहात लाइट नाही, विद्यार्थ्यांसाठीचे बेड, पंखे गायब आहेत. सुरक्षारक्षक असतानाही या वस्तू गायब झाल्या. संतनिवास तोडण्यात आले आहे. ट्रस्टच्या नावे सात एकर जागा असताना जागेवर केवळ तीन एकरच आहे; मग उर्वरित जागा कुठे गेली? याचा शोध घेणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारांना ट्रस्टीच जबाबदार आहेत. त्यामुळे सध्याचे ट्रस्टी बदलून नवीन ट्रस्टींची नेमणूक करावी, असेही आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज म्हणाले.
तोपर्यंत गोड पदार्थ खाणार नाही
जैन बोर्डिंगमध्ये श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे. मात्र, या ठिकाणी असलेली भगवान महावीरांची मूर्ती लहान आहे. या ठिकाणी मोठी मूर्ती असणे अपेक्षित आहे. जोपर्यंत या ठिकाणी मोठी मूर्ती येत नाही तोपर्यंत मी तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ खाणार नाही, असा निर्धार आचार्य श्री गुप्ती नंदीजी महाराज यांनी या वेळी केला.
सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या नावे मॉडेल कॉलनी येथे सात एकर जागा होती, असे समोर आले आहे. प्रत्यक्षात केवळ तीन एकर जागा शिल्लक आहे. उर्वरित जागेचे काय झाले, याचा तपास आम्ही करणार आहोत तसेच बंद वसतिगृह लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अक्षय जैन, सदस्य, जैन बोर्डिंग बचाव कृती समिती