

पुणे: राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मूल्यांकन करण्यात आले. त्यात गोंडवाना विद्यापीठ प्रथम क्रमांकावर, मुंबई विद्यापीठ द्वितीय क्रमांक, तर शिवाजी विद्यापीठ तृतीय क्रमांकावर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्व विद्यापीठांच्या तुलनेत 100 पैकी सर्वांत कमी 42 गुण मिळाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आता विद्यापीठाची प्रशासकीय गुणवत्तासुद्धा ढासळल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सर्व विद्यापीठांना आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम, सर्व संवर्गांची अद्ययावत ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळ सेवा नियुक्ती रिक्त परिस्थिती, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन व पाच कोर्स पूर्ण करणे, यासह सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे, या कामांसाठी एकूण 100 गुण देण्यात आले. त्यात गोंडवाना विद्यापीठाला सर्वाधिक 68, तर मुंबई व शिवाजी विद्यापीठाला प्रत्येकी 66 गुण मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वांत कमी 42 गुण मिळाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटल करणे, या घटकासाठी शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांचे अद्ययावतीकरण आणि डिजिटलायझेशन केले नसल्याचे स्पष्ट होते. मुंबई, कोल्हापूर, गोंडवाना, अमरावती विद्यापीठाला यासाठी 20 पैकी 20 गुण मिळाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एनआयआरएफ रँकिंगमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राज्य शासनाने केलेल्या गुणांकनातसुद्धा विद्यापीठ शेवटच्या स्थानी असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठामध्ये असणारे अपुरे मनुष्यबळ हेसुद्धा त्याचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केवळ प्राध्यापकच नाही, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा विद्यापीठाला करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.