

हडपसर: ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक झाल्याचे उघड होऊन चार महिने उलटून गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पुलावरील काही भागांवर पत्रे लावून वाहतूक एकेरी केली आहे. मात्र, पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने प्रवाशांना धोकादायकपणे प्रवास करावा लागण्यासह वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
येथील नव्या मुठा कालव्यावरील पुलाचा एक खांब ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. हा धोका लक्षात घेऊन पालिकेने तकलादू झालेल्या खांबावरील रस्त्याच्या भागात पत्रे लावून रस्त्यावरील भागात वाहतुकीला वळण दिले आहे. असे असले तरी रात्री-अपरात्री वाहन धडकून थेट कालव्यात कोसळण्याचा धोका येथे निर्माण झाला आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून ही परिस्थिती येथे आहे.
पालिका प्रशासनाकडून याची दुरुस्ती कधी होणार, असा सवाल प्रवाशांकडून सध्या केला जात आहे. ससाणेनगर, काळेबोराटेनगर, ससाणेवस्ती, चिंतामणीनगर व सातवनगर, सय्यदनगर, हांडेवाडी, होळकरवाडी, महंमदवाडी, उंड्री पिसोळी आदी भागांतील नागरिकांकडून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. विकास आराखड्यातील डीपी रस्ते रखडल्याने आणि जवळचा पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना येथूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे. कमकुवत झालेला हा पूल 1962 साली बांधण्यात आला आहे. त्याच्या शेजारी सिमेंटचा पिलर आहे. मात्र, दगडी खांबाचे एक एक दगड बाहेर पडू लागले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञ एजन्सीकडून त्याच्या दुरुस्तीचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी 68 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या निविदा मागविण्यात येतील. त्यानंतर खर्चाला मंजुरी घेऊन व पाटबंधारे विभागाचे शेड्युल घेऊन महिनाभरात काम सुरू केले जाईल. पर्यायी मार्ग व वाहतुकीचेही नियोजन करावे लागणार आहे.
अविनाश कामठे, उपअभियंता, महापालिका
ससाणेनगर - महमदवाडीकडे जाणारा रस्ता सतत रहदारीचा आहे. हा रस्ता अरुंद आहे, त्यात आता या मार्गावरील पुलाचा खालचा भाग ढासळल्यामुळे आणखी धोकादायक झाला आहे. कधीही दुर्घटना घडू शकते, त्यामुळे तातडीने प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
दिलीप कुलकर्णी, रवि पोटे, स्थानिक नागरिक, हडपसर