

सुवर्णा चव्हाण
पुणे: दोनाचे चार हात होण्याचा प्रसंग म्हणजे विवाहसोहळा. याच विवाहसोहळ्याचे नियोजन आत्तापर्यंत जोडप्यांचे संपूर्ण कुटुंबीय अन् नातेवाईक करायचे, मंगल कार्यालयांपासून ते छायाचित्रकारांचे नियोजन त्यांचेच असायचे. परंतु, आता ट्रेंड बदलला अन् गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे देण्याचा ट्रेंड वाढला आहे. सध्या सगळीकडे लग्नसराईची धूम असून, येत्या जूनपर्यंत लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळेच पुण्यातील सुमारे 100 हून अधिक कंपन्या कामाला लागल्या आहेत. लग्नातील सजावट असो वा केटरिंगपर्यंतचे नियोजन कंपन्यांकडून केले जात असून, पुण्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे कामही कंपन्यांकडेच सोपविण्यात येत आहे. योग्य आणि हव्या त्या थीमनुसार नियोजन होत असल्यामुळे कंपन्यांना नियोजनाची जबाबदारी देण्याकडे कल आहे.
वधू-वराचा साखरपुडा झाला की लग्नाचे नियोजन करण्यात संपूर्ण कुटुंबातील आणि नातेवाइक व्यग््रा असायचे. मंगल कार्यालयापासून ते बँड पथकापर्यंतच्या बुकिंगसाठी खूप धावपळ ते करत असत. एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे ते शक्य होत होते. मात्र, आता कुटुंबव्यवस्था विकेंद्रित झाली आहे. त्यामुळे लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी घेण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी दिली जात आहे. याशिवाय लग्नाचे सगळे सोहळे पाहायला आणि त्याचा आनंद घ्यायला कुटुंबीयांना वेळ मिळावा, म्हणून नियोजनाची सगळी जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे सोपविण्याचा कल वाढला आहे. ज्यांना हा खर्च परवडणारा आहे, त्या जोडप्यांकडूनच कंपन्यांना जबाबदारी दिली जात आहे.
रिसॉर्ट, लॉन्सच्या बुकिंगपासून ते सजावटीपर्यंत, केटरिंगपासून ते छायाचित्रकार, व्हिडीओपर्यंतचे सर्व नियोजन कंपन्यांकडून होत आहे. विशेषत: डेस्टिनेशन वेडिंगच्या नियोजनाची कामे कंपन्या करीत असून, पुण्यामध्ये तर हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याविषयी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, लग्नाचे नियोजन संपूर्ण कुटुंब आणि नातेवाइकांकडून केले जायचे. पण, आता ट्रेंड बदलला असून, तरुण जोडप्यांकडून लग्नाच्या नियोजनाची सूत्रे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे दिली जात आहेत. पुण्यातही हा ट्रेंड वाढला असून, खासकरून डेस्टिनेशन वेडिंगचे काम कंपन्यांना दिले जात आहे. पुण्यात लोणावळा, मुळशी, पानशेत, भोर, आंबेगाव आदी ठिकाणांसह खराडी, हिंजवडी येथील विविध रिसॉर्ट, लॉन्स येथे थीमनुसार डेस्टिनेशन वेडिंग होत आहेत. त्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याही कामाला लागल्या आहेत. खासकरून तरुण जोडप्यांच्या लग्नासाठी कंपन्या डेस्टिनेशन वेडिंगचे नियोजन करीत असून, जोडप्यांना आवडत असलेल्या ठिकाणी आणि त्यांच्या आवडत्या थीमनुसार नियोजन होत आहे.
जोडप्याने सांगितलेल्या थीमनुसार करते टीम नियोजन
लग्न म्हटले की नियोजन आलेच. ते करण्यासाठी सध्या कुणाकडेही वेळ नाही, साहजिकच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे लग्नाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवली जात आहे. आम्हीही यंदाच्या लग्नसराईत लग्नसोहळ्यांसह डेस्टिनेशन वेडिंगचेही नियोजन करत आहोत. आमची संपूर्ण टीम त्यासाठी कामाला लागली आहे. मंडप सजावटीपासून ते केटरिंगपर्यंत...सगळी कामे आमच्या टीमकडून केली जात आहेत. गोवा, राजस्थान आदी ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी आम्ही काम करत आहोत. जोडप्यांनी सांगितलेल्या विविध थीमनुसार आम्ही नियोजन करत आहोत. आताच्या घडीला काही साहित्यांवर जीएसटी कर वाढविण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम लग्नसराईवर झालेला नाही, असे एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालक अदिती कुलकर्णी यांनी सांगितले.
पुण्यातील सुमारे 100 कंपन्या लग्नाच्या नियोजनासाठी काम करीत आहेत. बोहो, रॉयल, कार्निव्हल... अशा थीमनुसार लग्न केले जात आहेत. त्यानुसार विविध ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग होत आहेतच. पण, आता पुण्यातही डेस्टिनेशन वेडिंगचेही प्रमाण वाढत आहे, त्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या काम करीत आहेत. जोडप्यांनी सांगितलेल्या थीमप्रमाणे सजावट करण्यापासून ते संगीत कार्यक्रमाच्या नियोजनापर्यंत, केटरिंगपासून ते मेकअपपर्यंतचे सर्व नियोजन ते करीत आहेत. एका लग्नाच्या नियोजनासाठी 20 जणांची टीम काम करते आणि 15 दिवसांची मेहनत करून जोडप्यांचे डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करीत आहेत.
निखिल कटारिया, सदस्य, इव्हेंट अँड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशन