जेजुरी कडेपठार मंदिरात गणपूजा

जेजुरी कडेपठार मंदिरात गणपूजा

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरीच्या खंडोबादेवाचा गणपूजा उत्सव जेजुरीच्या कडेपठारगडावरील खंडोबा मंदिरात साजरा करण्यात आला. भाविकांनी श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या स्वयंभू शिवलिंगांवर भंडाराच्या राशी केल्या. पुजारी सेवक, ग्रामस्थांनी यावर फुलांची आकर्षक सजावट केली. जेजुरीत खंडोबादेवाच्या सोमवती यात्रा, चंपाषष्ठी उत्सव, चैत्री पौर्णिमा, माघी पौर्णिमा, पौषी पौर्णिमा, दसरा उत्सव व गणपूजा उत्सव साजरे होत असतात.

पौराणिक काळात मणी, मल्ल असुरांवर विजय मिळविल्यानंतर ऋषिमुनींच्या आराधनेमुळे श्री खंडोबा परिवारासह कडेपठार गडावर आले. तेव्हा सर्व देवगण आणि ऋषींनी पूजा करून भंडारा व फुलांची पुष्पवृष्टी केली. तो दिवस आषाढ शुध्द प्रतिपदेचा होता. पौराणिक काळापासून आषाढ शुद्ध प्रतिपदेला जेजुरीगडावर गणपूजेचा उत्सव साजरा होतो, अशी आख्यायिका आहे.

रविवारी (दि. 18) मध्यरात्री कडेपठारगडावरील खंडोबा मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली. रामोशी समाजाची मानाची पूजा झाल्यानंतर मानकरी महाजन आणि विरकर यांनी देवाला भंडारा अर्पण करून शेज केली. त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत देवाला भंडारा अर्पण केला. पुजारी सेवकांच्या अर्पण भंडार्‍याच्या राशीतून श्रीखंडोबा आणि म्हाळसादेवीचे आकर्षक शिवलिंग साकारले. मध्यरात्री मंदिरातून देवाचा छबिना काढला. छाबिन्यासमोर वाघ्या-मुरळींचे ताफे तसेच घडशी समाजाच्या कलावंतांनी जागर केला.

सकाळी देवाला अर्पण भंडारा प्रसाद म्हणून वाटून गणपूजा उत्सव संपला. उत्सवासाठी कडेपठारगडावर हजारो भाविक उपस्थित होते.
उत्सवानिमित्त सचिन सातभाई, नीलेश बारभाई, अविनाश बारभाई, मंदार सातभाई, शुभम मोरे, विशाल लांघी, प्रसाद सातभाई, अनुराज बारभाई आणि पुजारी सेवकांनी मंदिरात सजावट केली. उत्सवात देवासमोर सेवा सादर करणार्‍या कलावंतांचा कडेपठार देवसंस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. कडेपठार खंडोबा देवतालिंग ट्रस्टचे विश्वस्त कर्मचारी, नित्य सेवेकरी, मानकरी, पालखी सोहळ्याचे खांदेकरी आणि ग्रामस्थांनी नियोजन केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news