पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार अभियंत्यांच्या अचानक बदल्या | पुढारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार अभियंत्यांच्या अचानक बदल्या

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील सुमारे 750 अधिकारी व कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्या बदल्या जून महिन्यात होणे अपेक्षित असताना अचानक दोन उपअभियंता व एका कनिष्ठ अभियंत्याची पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने बदली केली आहे. एका उपअभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पालिकेमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल यांसारखे 750 कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तीन ते सहा वर्षे झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियमानुसार मे महिन्यात बदल्या करण्यात येतात. त्यासाठी आता जून महिन्याचा मुहूर्त आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितला आहे. आठवड्याभरात या बदल्या होणे अपेक्षित आहे.

मात्र, या बदल्या न करता क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची तातडीने अचानक सोमवारी (दि. 19) बदली करण्यात आली आहे. उपअभियंता सुनील अहिरे यांची सेक्टर क्रमांक 23 येथून बदली करत बांधकाम परवानगी विभाग देण्यात आला आहे. तर ई क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागातील राजेश जगताप आणि ग क्षेत्रीय कार्यालयातील सुरेश लंगोटे यांचीही बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे. या तिघांची बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, स्थापत्य विभागास नव्याने 11 कार्यकारी अभियंता मिळालेले असताना ई क्षेत्रीय कार्यालयाात उपअभियंत्या देवेंद्र बोरावके यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. या अचानक झालेल्या पदभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सुमारे 750 अधिकारी व कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत असताना केवळ तीन ते चार कर्मचार्‍यांच्या ठराविक विभागात बदली झाल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकत्रित सर्वांच्या बदल्या न करता ठराविक कर्मचार्‍यांच्या तातडीने बदल्या केल्याने चर्चा रंगली आहे.

हेही वाचा

पिंपरी : महापालिकेचे 470 कोटी  राज्य शासनाच्या तिजोरीत

पुणे : जीडीपीच्या 20 टक्के खर्च शिक्षणावर व्हावा; गणितज्ञ प्रा. मंजुल भार्गव यांचे मत

पुणे : ‘त्या’ शिक्षकांना 16 हजार मानधन; पालकमंत्र्यांची बैठक

Back to top button