सोलापूर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

सोलापूर : सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मंद्रूप; पुढारी वृत्तसेवा : द. सोलापूर कुरघोट येथे सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. महेश बिराप्पा सलगरे (वय २८) असे या जवानाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. त्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे.

महेश हा ७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्याची पहिली नियुक्ती पंजाब येथे झाली तेथे चार वर्ष देशसेवा केल्यानंतर जम्मू काश्मीर येथे बदली झाली. तेथे तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर मध्य प्रदेशातील झाशी येथे त्याचे बदली झाली. आर्मीमध्ये ते चालक म्हणून सेवेत होते. महेश याने प्राथमिक शिक्षण कुरघोट जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्ण केले होते. पंधरा दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता. सोलापूर येथे त्याने जागा घेऊन घर बांधले असून २५ जूनला घराची वास्तुशांती होती. मात्र दोन दिवसांपूर्वी त्याच्या पोटाचा त्रास होत असल्यामुळे त्याला सैफुल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वी त्याचा विवाह हट्टी तालुका इंडी (जि. विजापूर) येथील साक्षी हिच्याशी झाला. संसार फुलण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुरघोट येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैनिक कल्याण केंद्र व मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे मंद्रूप, तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी मानवंदना दिली.

Back to top button