

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे ऐन हिवाळ्यात शहरातील राजकारण तापलं आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने रविवारी मोठा निर्णय घेतला. पुण्यात भाजपाने ‘मिशन महापालिका’ची तयारी सुरू केली असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल. तर गणेश बिडकर यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रविवारी पुण्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेसाठी टीम भाजपची घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्याचे निश्चित झाले असून पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावर पुणे शहर निवडणूक प्रमुखपदी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले गणेश बिडकर यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. निवडणुक काळात प्रचारामध्ये रोजचे संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर राहणार आहेत. त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह सात जणांची समिती मिळून आम्ही या निवडणुकाला सामोरे जाणार आहोत असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपची यंत्रणा बाराही महिने कार्यरत
यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भाजपची यंत्रणा बाराही महिने कार्यरत असते. परंतु, निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी म्हणून ही प्राथमिक बैठक झाली.
आजपासून अर्ज मागवणार
पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहता साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.