

पुणे: मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जागा विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी चारही पंथांतील जैन समाजाने एकत्र येत शुक्रवारी (दि. 17) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ‘धर्माचा व्यापार बंद करा’, ‘सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची जागा वाचवा’ अशा घोषणा देत जैन समाजाने विश्वस्तांच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला. (Latest Pune News)
पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत असलेल्या या बोर्डिंगची जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याचा समाजाचा आरोप आहे. ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती’च्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात जैन बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
बोर्डिंगपासून निघालेला मोर्चा संचेती हॉस्पिटलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला आणि शांततेत पार पडला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषीजी, माताजी महाराज या मुनिगणांसह शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे अभय छाजेड, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) चे प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव गट) चे संजय मोरे आदी राजकीय नेते उपस्थित होते.
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या 12 हजार चौरस मीटर भूखंडावर असलेले दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर हे जैन बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धाकेंद्र आहे. ट्रस्टच्या मालमत्तेबाबत विकसकांशी सुरू असलेले व्यवहार थांबवून मंदिराच्या अस्तित्वावर गदा येऊ नये, अशी समाजाची मागणी आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला विक्री करार आणि कर्ज करार तातडीने रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता केवळ धर्मादाय कारणांसाठीच वापरावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अल्पसंख्याक समाज असल्याने त्यांच्यावर अन्याय केला किंवा त्यांच्या मालमत्ता हडप केल्या, तरी कोणी विचारणार नाही, असा काही लोकांचा समज आहे. पण, समाजाची जागा विकू दिल्या जाणार नाहीत. काही विश्वस्तांना बंदुकीचा धाक दाखवला असेल किंवा ईडीची भीती दाखवली असेल, त्यामुळे त्यांनी जागा विकसकाला देण्याची तयारी दाखवली असेल, असा आरोपही शेट्टी यांनी या वेळी केला.
दरम्यान, या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुरुवारी (दि. 16) लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधून वसतिगृह आणि मंदिराविषयी समाजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.
जागा विक्रीचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे
मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग होस्टेलच्या जागेच्या विक्रीचा निर्णय वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उद्देशांसाठी घेण्यात आल्याचे सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच, मिळकतीबाबत निर्णय घेण्याचा हक्क आणि अधिकार ट्रस्टचा असल्याचे सांगताना अप्रत्यक्ष धार्मिक हस्तक्षेपामुळे प्रचंड त्रास झाला आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकात नमूद केल्यानुसार, सेठ हिराचंद नेमचंद जैन ट्रस्टची स्थापना 1958 साली गुलाबचंद हिराचंद आणि लालचंद हिराचंद यांच्यामार्फत करण्यात आली आहे. इथे गोरगरीब, गरजूंसाठी वसतिगृह आणि शैक्षणिक सोयी उपलब्ध करण्यासाठी ट्रस्ट तयार करण्यात आले. कोणत्याही विशिष्ट धार्मिक समुदायासाठी मर्यादित न ठेवता सर्वांना या सोयी उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता, असेही नमूद केले आहे.
ट्रस्टवर करण्यात आलेले आरोप चुकीचे व गैरहेतूने करण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रिया अवलंबून तसेच धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेऊन ही जागा खासगी विकसकाला विकण्यात आली आहे. तसेच, त्या ठिकाणी असणारे मंदिर पाडण्यात येणार असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. मात्र, मंदिर आहे तसेच ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच, होस्टेल बांधकाम देखील आधीपेक्षा मोठे असणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.