

राजगुरुनगर: खेड तालुक्यात गेली पाच महिन्यांत एक नाही, दोन नाही तर तब्बल 50 रोहित्रांची चोरी झाली आहे. यामुळेच शेतीचा वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी गावांच्या पिण्याचे पाणी बंद झाले आहे. एवढा गंभीर विषय असूनदेखील महावितरण व पोलिस प्रशासनाकडून निव्वळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. (Latest Pune News)
सध्या खेड तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडी सुरू आहेत. परंतु, तालुक्यात रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. खास टोळीच यासाठी सक्रिय असल्याचा शंका शेतकऱ्यांना आहे. गेली पाच महिन्यांत खेड तालुक्यात तब्बल 50 हून अधिक रोहित्रांची चोरी झाली. शेतवस्ती, कालवा व नदीच्या लगतचे व एमआयडीसीतील रोहित्रांची चोरी वारंवार होत आहे. तरीही संबंधित प्रशासन आणि पोलिस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
रोहित्र चोरीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, शेतीच्या कामावर परिणाम होत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण निमार्ण झाली आहे. दरम्यान, रोहित्राची सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, डीपीजवळ सीसीटीव्ही बसवावेत. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
पाणी योजना अडचणीत
खेड तालुक्यातील बहुतेक मोठ्या गावातील पिण्याच्या पाणी योजना रोहित्र चोरीमुळे अडचणीत आल्या आहेत. चास, निघोजे, कोरेगाव, शेलपिंपळगाव, आळंदी, चिंचोशी, चांदूस, कडूस गावांचा यात समावेश आहे.
रोहित्र चोरीला गेल्यामुळे पणतीच्या उजेडात दिवाळी साजरी करण्याची नामुष्की ओढवली आहे. खेड तालुक्यात अनेक भागात बिबट्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रोहित्र चोरीवर महावितरण व पोलिसांनी त्वरित ठोस उपाययोजना करावी.
रवींद्र आबा गायकवाड, जिल्हा विद्युत वितरण समिती सदस्य.