

शिक्रापूर : केंद्रात व राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे. यामुळे विविध विकासकामे मार्गी लावण्यात मदत होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.(Latest Pune News)
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या शिरूर तालुक्यातील पक्षकार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, ‘भीमाशंकर’चे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, विश्वास कोहकडे, सुभाष उमाप, राजेंद्र गावडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षा निर्मला नवले, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे, माजी अध्यक्षा केशरताई पवार, आबासाहेब पाचुंदकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविता खेडकर, सविता बगाटे, नंदकुमार पिंगळे, सुनीता गावडे, ज्योती पाचुंदकर, शिवाजीराव ढोबळे, सदाशिव पवार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक बाळासाहेब टेमगिरे, लहू थोरात, सुजाता नरवडे, मनीषा गावडे, अमोल जगताप, अजित कोहकडे, राजेश सांडभोर, बाळासाहेब भोर आदीसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्रात व राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. यामुळे गावागावांत विकासकामे मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रतिनिधी आपल्या विचाराचे हवे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याच्या तयारीला लागावे. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना व गावविकासाची कामे मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महत्त्वाच्या असतात. कांदा व बिबट्याच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे वेळ मागितला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील 42 गावांत कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. ही कामे व पक्षाचे विचार पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना आगामी काळात जशास तसे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी प्रा. माणिक खेडकर, सुदाम इचके, सविता पऱ्हाड, वासुदेव जोरी, निर्मला नवले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शुभांगी पडवळ यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. दीपक रत्नपारखी यांनी आभार मानले.