

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धायरी येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. ड्रेनेजलाईनची वारंवार दुरुस्ती करूनही ही समस्या सुटत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. तर, दुसरीकडे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धारेश्वर मंदिर परिसरात जाणार्या मुख्य रस्त्याच्या गटारात ड्रेनेजचे पाणी साठून रस्त्यावर वाहत आहे. या ठिकाणी उतार असल्याने थेट रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ, किरकोळ विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.
माजी सरपंच गुलाबराव पोकळे व नागरिकांनी सांडपाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जुन्या गावठाण परिसरातील मुख्य रस्त्यावरच पाणी वाहत आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. पोकळे म्हणाले की, उघड्यावरून वाहत असलेल्या सांडपाण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
जुन्या लाईन अपुर्या पडत आहेत. त्यामुळे ड्रेनेजची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रशस्त ड्रेनेजलाईन टाकण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. निधी मंजूर झाल्यानंतर हे काम सुरू होईल.
– प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त,
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.
हेही वाचा