पुरंदर उपसा योजना आमदारांची खासगी मालमत्ता आहे काय? माजी मंत्री विजय शिवतारे

पुरंदर उपसा योजना आमदारांची खासगी मालमत्ता आहे काय?  माजी मंत्री विजय शिवतारे

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर उपसा योजना आमदार आणि ठेकेदार यांची खासगी मालमत्ता आहे काय? असा जाहीर सवाल माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांना केला आहे. काँग्रेसचा ठेकेदार विकास इंदलकर यांच्याकडून योजना काढून घ्यावी आणि तात्पुरता दुसरा ठेकेदार नेमावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदरेश्वरा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शिवतारे बोलत होते. शिवतारे म्हणाले, पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांचे फळबागांचे नुकसान झाल्यावर नुकसानभरपाई देण्याऐवजी पुरंदर उपसा योजनेतील पाणी त्यांना टँकरद्वारे दिल्यास फळबागा जगतील व शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना भरपाई म्हणून मिळणारी रक्कम पाण्यासाठी खर्च करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

संबंधित बातम्या :

पुरंदर उपसा जलसिंचन योजना तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरली आहे. परंतु, काँग्रेसचे आमदार संजय जगताप
यांनी त्यांच्या पक्षाचा एक ठेकेदार योजनेसाठी नेमला आहे. जे मतदान करतील त्यांनाच पाणी दिले जाते, तर इतरांना पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नाही. पैसे भरण्यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली असताना ठेकेदार रोख रक्कम मागतो. तसेच रकमेची पावती दिली जात नाही. त्यांच्याकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. या वेळी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश इंगळे, महिला आघाडीच्या नेत्या ममता शिवतारे-लांडे, सासवड शहरप्रमुख मिलिंद इनामके, सचिव प्रवीण लोळे, मंगेश भिंताडे, अविनाश बडदे उपस्थित होते.

चाराडेपोसाठी तहसीलदारांना सूचना
जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सध्या बिकट झाला आहे. लम्पीचा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने जनावरांच्या छावण्या न उभारता गावोगावी चाराडेपो उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुरंदरमध्ये प्रशासनाने यासाठी तातडीने पाहणी करावी, यासाठी तहसीलदारांना सूचना केल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news