‘ओव्हरलोड’ वाहनांमुळे मिळतंय अपघातांना आमंत्रण

‘ओव्हरलोड’ वाहनांमुळे मिळतंय अपघातांना आमंत्रण

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती शहर आणि तालुक्यात आरटीओ आणि पोलिसांच्या आशीर्वादाने ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता धोकादायक पद्धतीने वाहनातून मालाची वाहतूक केली जात असल्याने मागील दोन महिन्यांत सर्वाधिक अपघात बारामती तालुक्यात झाले आहेत. यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

बारामती औद्योगिक वसाहतीतून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतून येणार्‍या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक सुरू आहे. जडवाहनांना शहरात बंदी असतानाही अनेक जडवाहने शहरातील मुख्य चौकात येतात. वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस कर्मचारी अशा वाहनांवर मेहरबान असल्याने कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.

शहराबाहेरून जाणार्‍या बाह्यमार्गावर जडवाहनांची वाहतुकीची व्यवस्था आहे. शहराबाहेरील मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणारी वाहने धोकादायक पध्दतीने प्रवास करत असतात. यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मळीची व खतांची वाहतूक, उसाची वाहतूक, छोट्या-मोठ्या ट्रकमधून होणारी विविध प्रकारची वाहतूक, सिमेंट, पत्रा, स्टील याबाबतीत कोणतीही सुरक्षा न बाळगता होणारी वाहतूक, यामुळे बारामती शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे.

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याशिवाय शहर आणि तालुक्यात वाळू व्यवसायही तेजीत आला असून अशा अवैध धंद्यांवरही आरटीओ, महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे. बारामतीतून जाणार्‍या इंदापूर, निरा, मोरगाव, जेजुरी, पुणे, दौंड, पाटस, भिगवण, फलटण रस्त्यावर अशा प्रकारची धोकादायक वाहतूक सुरू असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरात वाहतुकीचा बोजवारा

विनापरवाना वाहने चालविणे, अपुरी कागदपत्रे, विमा व वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नसणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, वाहनांना बसविलेले कर्णकर्कश हॉर्न, नंबरप्लेटशिवाय धावणारी वाहने, जडवाहतूक करणारी वाहने, रस्त्याच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त लावलेली वाहने या कारणांमुळे बारामतीकर हैराण झाले असून, वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news