पुणे : कर भरतो हो… विमा कधी मिळणार ते सांगा?

पुणे : कर भरतो हो… विमा कधी मिळणार ते सांगा?

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नियमित मिळकतकर भरणार्‍याच्या कुटुंबासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणार्‍या 'पंडित दीनदयाळ अपघात विमा योजने'च्या अंमलबजावणीसाठी सत्ताधारी व प्रशासन दोघेही उदासीन असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या अंदाजपत्रकामध्ये 'पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना' मांडली. 2018-19 या आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मिळकतकराचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रामाणिकपणे नियमित कर भरणार्‍या मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजने अंतर्गत पाच लाखांचे अर्थसाहाय्य मिळेल, असा यामागील उद्देश आहे. या योजने अंतर्गत महापालिकेकडून कर आकारणी झालेल्या मिळकतधारकांचा ग्रुप विमा काढण्यात येत असून, दरवर्षी सहा ते सात कोटी रुपये विमा कंपनीला भरण्यात येतात. दुसर्‍या वर्षी या योजनेत मिळकतधारकासोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला.

दरम्यान, दरवर्षी जाहिरात काढून विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. चालू आर्थिक वर्षामध्ये 24 सप्टेंबर 2021 मध्येच कंपनीची मुदत संपली आहे. त्यानंतर अद्यापही कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मागील पाच महिन्यांत या योजनेअंतर्गत एकाही नागरिकाने महापालिकेकडे अर्ज दाखल केला नाही. यासंदर्भात आरोग्य विभागातून माहिती घेतली असता, विमा कंपनीकडूनच महापालिकेच्या कसबा पेठ जन्म मृत्यू कार्यालयातील मृत्यूंच्या नोंदी घेऊन विम्याचे दावे तयार करण्यात येतात, असे समजले. मागील तीन वर्षांत दरवर्षी साधारण 50 ते 55 मिळकतधारकांना व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ झाला आहे.

पंडित दीनदयाळ अपघात विमा योजनेचे अर्ज महापालिकेकडेच येणे अपेक्षित आहे. मागील पाच महिन्यांत किती अर्ज आले, याची माहिती घेण्यात येईल. योजनेसाठी विमा कंपनी नियुक्तीची निविदा मंजूर करण्यात आली असून, लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येईल.
डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news