पुण्यातील गोल्ड बॉय रिलस्टारकडून सराईताने उकळली खंडणी; बदनामी करण्याची दिली धमकी

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन येथील 'गोल्ड बॉय' म्हणून प्रसिध्द असलेल्या मोनू बडेकर याला एका सराईत गुन्हेगाराने गंडा घातला आहे. त्याच्याशी दोस्ती करून प्रथम त्याची 18 तोळ्याची सोनसाखळी वापरण्यास घेतली. त्यानंतर सोनसाखळी परत न देता, ती चोरीची असल्याचे पोलिसांना सांगेन असा दम भरत तब्बल दोन लाखाची खंडणी उकळली. त्याची सोशल मीडियावर बदनामीही केली.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोनू बाळासाहेब बडेकर(30, रा. तुपेवस्ती, उरळी कांचन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश उर्फ मल्लाप्पा साहेबान्ना होसमानी(31, रा. लोणी काळभोर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनू याचा शेतकरी परिवार आहे. तर त्याला इन्स्टाग्रामवर रिल्स करण्याचा छंद आहे. त्याचे साडेचार लाख फॉलोअर्स आहेत. त्याची महेश होसमानी याच्याबरोबर ओळख झाली होती. महेशने मोनूला मी तुमचे इन्टाग्रामवरील रिल्स पाहत असून, तुमचा खूप मोठा फॅन असल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्यात ओळख वाढून मैत्री झाली. त्यानंतर महेश वारंवार मोनूच्या आईच्या जनसंपर्क कार्यालयात त्याची भेट घेत होता.

दरम्यान 15 सप्टेंबरला महेशने त्याच्या सासुरवाडीत एक कायर्क्रम आहे, त्यासाठी मोनूकडे सोन्याची चेन एक दिवस वापरायला मागितली. मोनूने 18 तोळे सोन्याची चेन महेशला दिली. मात्र दुसर्‍या दिवशी तो चेन परत घेऊन आला नाही. मोनूने त्याला फोन केला असता, चेन 20 हजारात गहाण ठेवली असे सांगून ती सोडवण्यासाठी 20 हजार गुगल पेवर घेतले. मात्र सहा महिने होऊनही महेशने सोन्याची चेन परत केली नाही.

अखेर मोनूने त्याच्या घरी जाऊन सोन्याची चेन मागितली असता, महेशने 'माझ्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, मी तुला चोरीचे सोने दिले असल्याचे सांगून गुन्ह्यात अडकवीन', असा दम भरला. तसेच 'तू खूप मोठा रिल्स स्टार समजतो ना, बघ तुझी कशी सगळी हवा काढतो… तू आताच्या आता मला तीन लाख रुपये दे; अन्यथा तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन', असे म्हणत खंडणीची मागणी केली.दरम्यान, महेशने बदनामीकारक व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर टाकला. बदनामीच्या भीतीने मोनूने दोन लाख दिले तसेच सोन्याची चेनही परत घेतली नाही. मात्र, महेशकडून पैशाची मागणी वाढू लागल्याने मोनूने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news