

पुणे: सिंहगड रस्ता परिसरात नुकताच तयार झालेला राजाराम पूल ते फनटाईम चौकदरम्यानचा उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल 66 ठिकाणी तोडण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात निधी वाया जाणार असून, वाहतूक कोंडी, सुरक्षेचे धोके आणि अपघातांची शक्यता वाढेल, त्यामुळे हा प्रकल्प दुसऱ्या मार्गाने राबवण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
पुणे शहर आपचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबत निवेदन देत, खराडीड्ढखडकवासला आणि हिंजवडीड्ढमाणिकबाग मेट्रोमार्गांसाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून मेट्रोचे खांब उभारावेत, अशी ठाम मागणी केली आहे. बेनकर म्हणाले, ‘118 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा उड्डाणपूल अजून पूर्णक्षमतेने वापरातही नाही, त्याचवेळी 66 ठिकाणी तोडफोड करणे म्हणजे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे. पुलाची रुंदी कमी झाल्यास वाहतूक कोंडी पुन्हा वाढेल. शिवाय ठिकठिकाणी तोडफोड झाल्याने पुलाला भगदाडे पडण्याची व गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे.’
सिंहगड रोड, वडगाव, धायरी, नऱ्हे, खडकवासला परिसरातील नागरिक तसेच पानशेतड्ढसिंहगड भागात येणाऱ्या लाखो पर्यटकांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर काहीच महिन्यांत त्याचे मोठ्या प्रमाणावर तोडकाम करण्याची वेळ आली असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पूल उभारणीच्या वेळी मेट्रो प्रकल्पाचा विचार करूनच तरतूद केली असल्याचे महापालिकेकडून सांगितले गेले होते. मात्र, आता पुन्हा 66 ठिकाणी तोडफोड का आवश्यक, हा प्रश्न नागरिकांसह आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.