

पुणे : कलाकारांच्या मुलाखती, नाटकांच्या तालमींचे व्हिडीओ, एआयद्वारे तयार केलेली पोस्टर्स, नाटकांचे टीझर, नाट्याभिवाचन आणि मायक्रो ड्रामा सीरिज, अशा गोष्टी फेसबुक अन् इन्स्टाग््राामवर सध्या आपल्या नजरेस पडत असतील. कारण, काळानुसार बदल स्वीकारत भारतातील विविध भाषांमधील रंगभूमीही डिजिटल मार्केटिंगकडे वळली आहे. तसेच, सोशल मीडियामुळे ती जागतिक प्रकाशझोतातही आल्याचे दिसून येत आहे.
नाटकांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला असून, नाटकांची प्रसिद्धी आता फेसबुक, इन्स्टाग््रााम, यूट्यूब आणि व्हॉट्सॲपद्वारे केली जात आहे. विशेष म्हणजे पडद्यामागील क्षण (बिहाईंड द सीन्स) शेअर करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. फक्त मराठीतीलच नव्हे तर हिंदी, बंगाली, गुजराती, दाक्षिणात्य अशा विविध भाषांमधील रंगभूमीवरील नाटके सोशल मीडियाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचली असून, त्यामुळे काही कलाकारांना विविध देशांमध्ये जाऊन नाट्यप्रयोग करण्याची संधीही मिळत आहेत.
शुक्रवारी (दि.27) साजऱ्या होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनानमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या आढाव्यात भारतीय रंगभूमीवर प्रायोगिक असो वा व्यावसायिक नाटक, प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून आले. कोरोनाकाळात ठप्प झालेल्या नाट्यविश्वाला सोशल मीडियाने नवी दिशा दिली. त्या काळात सुरू झालेला डिजिटल प्रवास आता नाट्यप्रचार-प्रसाराचा अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, इन्स्टाग््रााम, यूट्यूब, एक्स आणि व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांनी विविध भाषांमधील नाटकांच्या प्रचाराला नवे परिमाण दिले आहे. अनेक नाट्यसंस्थांनी अधिकृत संकेतस्थळेही सुरू केली आहेत. नाटकांचे ट्रेलर्स, निवडक प्रसंग, कलाकारांच्या मुलाखती, रील्स आणि छोट्या व्हिडीओंच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जात आहे.
विशेषतः नाटक सुरू होण्यापूर्वीच त्याची डिजिटल चर्चा रंगताना दिसत आहे. परिणामी, भारतातील विविध भाषांमधील नाटकांचा आवाका केवळ रंगमंचापुरता न राहता जागतिक स्तरावर विस्तारत आहे. मराठी रंगभूमीही त्यात मागे नाही. इतकेच नव्हे तर नाट्यप्रयोगांच्या तारखा, ठिकाण, नवीन नाटकांची प्रसिद्धीही करण्यात येत आहे. तसेच, फेसबुक आणि इन्स्टाग््रााम लाइव्हद्वारे कलाकार थेट संवाद साधत आहेत. यामुळे जगभरातील प्रेक्षकांचे अभिप्राय आणि प्रतिक्रियाही कळत आहेत.
नाटकांवर आधारित व्हिडीओला चांगला प्रतिसाद
स्वतंत्र थिएटरच्या धनश्री हेबळीकर म्हणाल्या, आम्ही हिंदी भाषेत नाट्यनिर्मिती करतो. मराठीतील अनेक नाटके आम्ही हिंदीत आणली आहेत आणि त्याचे प्रयोग देशविदेशांत होत आहेत. आम्ही नाटकांच्या प्रयोगांच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर करत आहोत. सोशल मीडियामुळे नाटक जगभर पोहोचत आहे. नाटकांवर आधारित व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळतो. सोशल मीडिया हे आता रंगभूमीसाठी महत्त्वाचे माध्यम बनले आहे.
‘मायक्रो ड्रामा सीरिज’लाही तरुणाईची पसंती
सोशल मीडियामुळे ‘मायक्रो ड्रामा सीरिज’ हा नवीन प्रकार लोकप्रिय झाला आहे. विशेषतः तरुणाईमध्ये या प्रकाराला मोठी पसंती मिळत आहे, तर काही ठिकाणी ‘व्हर्च्युअल थिएटर’मुळे घरी बसूनही नाट्यप्रयोग पाहता येत आहेत. यामुळे परदेशातील प्रेक्षकांनाही नाटकांचा आनंद घेता येत आहे.