

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या आई एकवीरा देवीची चैत्र पालखी यात्रा झाल्यानंतर रात्री उशिरा पायथा मंदिरासमोर भाविकांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरून तुफान दगडफेक व हाणामारी झाली. कल्याण कोळीवाडा व पनवेल कोळीवाडा या दोन गटांमध्ये ही दगडफेक व हाणामारी झाली. मागील काही वर्षांपासून या दोन गटांमध्ये वैयक्तिक वाद आहेत, या वादाचे पुनर्वसन यंदा पालखी संपन्न झाल्यानंतर पायथ्या मंदिरासमोर या दोन्ही पालख्या व गट एकत्र समोरासमोर आल्यानंतर ही हाणामारी झाली.
दोन गटांमध्ये झालेल्या वादाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासनाने व स्थानिक नागरिकांनी त्यामध्ये हस्तक्षेप करत सदरचे वाद मिटवले. मात्र, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा या दोन गटांमध्ये तुफान दगडफेक व हाणामारी झाली. यामध्ये काही तरुण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, या दोन्ही गटांवर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
दिनेश तायडे म्हणाले, या दगडफेक व हाणामारीशी यात्रा पालखी देवस्थान याचा कोणताही संबंध नाही. या दोन गटांमध्ये पूर्वीपासून असलेल्या वैमनस्यातून हे वाद झाले आहेत. घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये शांतता आहे. भाविकांनी कोणत्याही खोटे अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी येऊन देवीचे शांततेमध्ये दर्शन घ्यावे. बंदोबस्तासाठी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे म्हणाले, या भांडणाचा देवस्थानशी अथवा देवीच्या पालखीशी कोणताही संबंध नाही. दोन गटांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या वैमनस्यातून हे वाद झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, भाविकांनी कोणतेही अफवांवर विश्वास न ठेवता या ठिकाणी येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन द्यावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुलभ दर्शनासाठी या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासन सज्ज आहे.