

पुणे: कधी काळी ज्या न्यूझीलंडने भारतीय स्वप्नांचा चक्काचूर केला होता, त्याच किवींच्या पंखांना छाटून भारतीय गरुडाने विश्वचषकाच्या शिखरावर झेप घेतली. अंतिम फेरीच्या या महासंग््राामात भारताने न्यूझीलंडला धूळ चारली आणि विश्वविजेतेपदाचा ‘अजिंक्यतारा’ पुन्हा एकदा भारतीयांच्या नशिबात चमकला.
या ऐतिहासिक विजयाचा गुलाल पुण्याच्या हवेत असा काही मिसळला, की शनिवारवाड्याच्या तटबंदीपासून ते आयटी पार्कच्या काचेच्या इमारतींपर्यंत सगळीकडे फक्त ‘इंडिया... इंडिया...’ असा एकच नाद घुमत होता.
ढोल-ताशांच्या दणदणाटात, फटाक्यांच्या लखलखाटात आणि ‘भारत माता की जय’च्या गर्जनेत अवघे पुणे शहर न्हाऊन निघाले. हे केवळ विजयाचे सेलिबेशन नव्हते, तर प्रत्येक पुणेकर क्रिकेटप्रेमीच्या मनात साठलेल्या स्वप्नांचे साक्षात प्रकटीकरण होते. लक्ष्मी रोड, फर्ग्युसन रोडवर उसळलेला अलोट जनसागर पाहून असे वाटत होते, की यंदाची दिवाळी काही महिने आधीच पुण्यात अवतरली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाला आणि काळाच्या आव्हानांना थोपवत भारतीय वाघांनी आयसीसी वर्ल्ड कपच्या रणधुमाळीत न्यूझीलंडचा पराभव केला आणि विश्वविजेतेपदाचा कलश भारतात आणला. या ऐतिहासिक विजयाची बातमी पुण्यात धडकताच, विद्येचे माहेरघर असलेल्या या शहराने साक्षात इंद्राच्या अमरावतीचे रूप धारण केले होते.
केशरी-धवल-हरित रंगांची उधळण
कालची रात्र पुण्यासाठी ‘काळरात्र’ नसून ‘दीपोत्सवाची रात्र’ ठरली. पुण्याचे रस्ते जणू तिरंग्याच्या वस्त्राने नटलेले दिसत होते. लक्ष्मी रोड असो वा कोथरूडचा पौड रोड, प्रत्येक ठिकाणी जनसागराचा असा काही लोंढा उसळला होता, की जणू पुण्याच्या रस्त्यांवरून आनंदाचा महासागरच वाहत होता. तरुणाईच्या अंगात संचारलेले चैतन्य पाहून असे वाटत होते की, प्रत्येक जण स्वतः मैदानातून विजय खेचून आणल्याच्या आविर्भावात आहे.