

पुणे: शहरात आठ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 1 कोटी 69 लाख 75 हजार 449 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाघोली परिसरातील एका 41 वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी 16 एप्रिल ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत शेअर मार्केटच्या नावाखाली 53 लाख 30 हजार 180 रुपयांनी फसवल्याची घटना घडली.
धनकवडी येथील 53 वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी 26 फेबुवारी 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत इन्शुरन्स कंपनीत अडकलेले पैसे परत मिळवून देतो सांगत 18 लाख 37352 रुपयांना फसवले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आनंदनगर, सिंहगड रोड येथील 35 वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी 2 ते 15 एप्रिल 2026 दरम्यान तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचे ट्रान्झेक्शन झाले असून, पोलिस तपासात मदत करण्यास सांगत 39 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विद्यापीठातील हॉस्टेलमधील एका 28 वर्षीय तरुणाची सायबर चोरांनी 9 नोव्हेंबर 2025 रोजी इन्व्हेस्टमेंट खाते तयार करण्याची थाप मारून 2 लाख 59 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घोरपडी गाव येथील 46 वर्षीय तक्रारदाराची सायबर चोरांनी 29 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 4 लाख 55750 रुपयांची फसवणूक केली. मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
खराडी येथील 71 वर्षीय ज्येष्ठाची सायबर चोरांनी 2 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 यादरम्यान शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. धानोरीत 65 वर्षीय ज्येष्ठाची सायबर चोरांनी 26 ते 29 मार्च 2025 या काळात मनी लाँड्रिंगचे ट्रान्झेक्शन तुमच्या बँक खात्यातून झाल्याचे सांगत 7 लाख 23 हजारांची फसवणूक केली. लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
60 वर्षीय महिलेला 38 लाख 44 हजारांना गंडवले
लोहगाव येथील 60 वर्षीय महिलेची रिझर्वेशनचे टास्क पूर्ण करण्याची बतावणी करत सायबर चोरांनी 22 डिसेंबर 2025 ते 4 फेबुवारी 2026 या कालावधीत 38 लाख 44 हजार 570 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकींच्या गुन्ह्यांचा तपास संबंधित ठाण्यांचे पोलिस निरीक्षक करत आहेत.