स्वतंत्र महापालिकेचा प्रस्ताव टेबलावर : आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

स्वतंत्र महापालिकेचा प्रस्ताव टेबलावर : आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनंतर आता पुणे जिल्ह्यात तिसर्‍या महापालिकेच्या स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. चाकण, आळंदी देवाची आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांसह लगतच्या गावांची एकत्रित महापालिका करण्याचा प्रस्ताव असून, यासंदर्भात आज शुक्रवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात या नव्या महापालिकेची रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत 34 गावांच्या समावेशानंतर पुणे हे भौगोलिकद़ृष्ट्या देशातील दुसर्‍या क्रमांकाची महापालिका बनली आहे.

त्यामुळे हडपसरसह पूर्व भागातील गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. तर औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आळंदी देवाची, देहू, चाकणसह लगतच्या गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर आता राज्य शासनाने या दोन्ही महापालिकांमध्ये आणखी नव्याने गावांचा समावेश करणे शक्य नसल्याने तिसरी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वाधिक वेगाने नागरीकरण होत असलेल्या आळंदी देवाची, चाकण आणि राजगुरुनगर नगरपरिषद आणि लगतच्या गावांची एकत्रित महापालिका करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

यासंदर्भात नगरविकास विभागाने पुणे विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात अभिप्राय मागविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून अभिप्राय मागविला आहे. त्यात प्रामुख्याने या तीनही नगरपरिषदा आणि त्या लगतची गावे, त्यांचे एकूण क्षेत्रफळ यासंबंधीची माहिती मागविली आहे. त्यानुसार आता संबंधित अहवालावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला पुणे जिल्हा परिषद, पीएमआरडीए व दोन्ही महापालिकांच्या अधिकार्‍यांना या बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत स्वतंत्र महापालिकेची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

एकाच तालुक्याची स्वतंत्र महापालिका

चाकण, आळंदी देवाची आणि राजगुरुनगर या तीन नगरपरिषदा राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील आहेत. त्यात चाकण परिसर मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे, राजगुरुनगर परिसराची ही अवस्था आहे. तर, आळंदी देवाची हे तीर्थक्षेत्र असल्याने या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे एकाच तालुक्यातील तीन नगरपरिषदांची स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news