कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीची तज्ज्ञांकडून पाहणी | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीची तज्ज्ञांकडून पाहणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारपासून करवीर निवासिनी अंबाबाईदेवी मूर्तीच्या पाहणीस सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज व आर. एस. त्र्यंबके यांनी गुरुवारी सकाळी 7 ते 10 या तीन तासांत अंबाबाईदेवीच्या मूर्तीची पाहणी केली. शुक्रवारीही (दि. 15) मूर्तीची पाहणी होणार असून याबाबतचा अहवाल न्यालयाला सादर करण्यात येणार आहे. पाहणीबाबत त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही तज्ज्ञांनी मूर्तीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी याबाबत माध्यमांना कोणतीही माहिती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शुक्रवारी पुन्हा सकाळी पाहणी करून पाहणीचा संपूर्ण अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबाबाई मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांकडून पाहणी करण्याबाबतचा दावा श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. याबाबत निकाल देताना न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी मांगीराज व त्र्यंबके यांची नियुक्ती केली. त्यानुसार गुरुवारी दोन्ही तज्ञांनी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन मूर्तीची संपूर्ण पाहणी केली. मूर्तीची स्नानापूर्वीची तसेच स्नानानंतरची स्थिती व अन्य पाहणीच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. पाहणीवेळी वादी श्रीपूजक गजानन मुनिश्वर, देवस्थान समितीचे सचिव सुशांतकिरण बनसोडे, पुरातत्त्व खात्याचे उत्तम कांबळे, याचिकाकर्ते लाभेश मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर, अ‍ॅड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई, महादेव दिंडे, माधव मुनिश्वर, अजित ठाणेकर उपस्थित होते.

Back to top button