अश्लील कंटेंट : ‘या’ १८ ओटीटी प्लॅटफॉर्मस्वर बंदी | पुढारी

अश्लील कंटेंट : ‘या’ १८ ओटीटी प्लॅटफॉर्मस्वर बंदी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अश्लील मजकूर प्रसारित करणार्‍या 18 ओटीटी प्लॅटफॉर्मस्वर केंद्र सरकारने बंदी घातली असून, असाच कंटेंट लोकांना पुरविणारी 19 संकेतस्थळे, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सही केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबतची अधिसूचनाही जारी केली असून, वरीलप्रमाणे सर्व माध्यमे महिलांबद्दल अश्लील, असभ्य आणि अवमानजनक मजकूर प्रसारित करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 आणि 67 अ, महिलांचे अशोभनीय प्रकटीकरण प्रतिबंध कायद्याच्या (1986) कलम 4 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गुरुवारी सांगण्यात आले. बंदी घालण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मस्च्या नावांची यादीही सरकारने प्रसिद्ध केली आहे.

1 कोटीवर डाऊनलोड, 32 लाखांवर फॉलोअर्स

बंदी घातलेल्या ओटीटी अ‍ॅप्सपैकी एक अ‍ॅप 1 कोटीवर लोकांनी डाऊनलोड केले होते. अन्य दोन अ‍ॅप्सना गुगल प्ले स्टोअरवरून 50 लाखांवर डाऊनलोड मिळाले आहेत. शिवाय, या ओटीटी प्लॅटफॉर्मस्ने आपली संकेतस्थळे आणि अ‍ॅप्सकडे सबस्क्रायबर्सना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला. संबंधित सोशल मीडिया अकाऊंटस्च्या यूझर्सची संख्याही तब्बल 32 लाखांवर आहे.

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मस्वर बंदी

ड्रीम्स फिल्म्स, वुवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राईम, नियॉन एक्स व्हीआयपी, बेशरम्स, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रामूड, न्यूफ्लिक्स, मूडएक्स, मोजफ्लिक्स, हॉट शॉटस् व्हीआयपी, फुगी, चिकूफ्लिक्स आणि प्राईम प्लेचा बंदी घालण्यात आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मस्मध्ये समावेश आहे.

सर्जनशील अभिव्यक्तीच्या नावाखाली बिभत्सपणा खपवून घेतला जाणार नाही.
– अनुराग ठाकूर
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

Back to top button