

बावडा: इंदापूर तालुक्यामध्ये एका बाजूला थंडी वाढत असून, दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामाने वेग घेतला आहे. सध्या तालुक्यात प्रत्येक रस्त्यावर साखर कारखान्यांकडे उसाची ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ पहावयास मिळत असून, सर्वत्र ऊस तोडणी मजुरांचा वावर वाढला आहे.
ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी ऊसतोडणीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या ऊसतोडणी मजुरांना त्यांच्या गावाहून ऑक्टोबर महिन्यातच तालुक्यात आणून कोपी करून ठेवल्या होत्या. त्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार तालुक्यामध्ये दि. 1 नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.
परिणामी सध्या सर्वत्र ऊसतोडणी मजूर, उसाची वाहने व ऊस उत्पादन शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळत आहे. ऊसतोडणी मजुरांमूळे इंदापूर तालुक्यातील बाजारपेठा गजबजून गेल्या असून आर्थकि उलाढाल वाढत असल्याने व्यापारी व संबंधित वर्गांमध्ये समाधानी वातावरण दिसून येत आहे, असे व्यावसायिक नवनाथ पवार (बावडा) यांनी नमूद केले.
त्याप्रमाणे साखर कारखाना चालू झाल्याने जनावरांना उसाचे वाडे सहजपने उपलब्ध होत असल्याने सर्व जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नही सध्या मार्गी लागला आहे, असे दूधगंगा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष विक्रम कोरटकर (वकीलवस्ती) यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात निरा-भीमा, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहयोग ओंकार शुगर, छत्रपती, बारामती ॲग््राो असे चार साखर कारखाने आहेत. शिवाय अकलूज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे कार्यक्षेत्रही इंदापूर तालुक्यात आहे. यामधील बहुतेक साखर कारखान्यांनी 1 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरीमुळे गारठा जरी वाढलेला असला तरी ऊस तोडणी मजूर त्यावर मात करीत, पहाटेच ऊस फडात तोडणी साठी दाखल होत आहेत. एकंदरीतच, ऊसतोडणी व ऊस वाहतुकीच्या वाहनांची लगबग आगामी तीन-चार महिने चालू राहणार आहे, असे सध्याचे चित्र आहे.