Pune News : ‘खडकवासला’सह‘उजनी’लाही आधार! जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ

Pune News : ‘खडकवासला’सह‘उजनी’लाही आधार! जोरदार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ
खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा लाभ धरणसाखळीतील चार धरणांसह अद्यापपर्यंत कमी पाणीसाठा असलेल्या उजनी प्रकल्पालाही झाला आहे. मुठा खोर्‍यासह इतर नद्यांच्या खोर्‍यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे उजनीला थोडा दिलासा मिळाला आहे.
सोमवारच्या (दि.2) उघडिपीनंतर मंगळवारी दुपारपासून धरण क्षेत्रात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरण साखळीत 28.41 टीएमसी (97.46 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. यंदाच्या पावसाळ्यात खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात 1.10 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले. त्यातील 0.59 टीएमसी पाणी गेल्या सहा दिवसांपासून सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे.
पावसाने उघडीप घेतली असली  दमदार पावसामुळे मात्र डोंगरकडे, ओढे-नाल्यांचे प्रवाह सुरू असल्याने पानशेतमधून600 क्सुसेक विसर्ग सुरू आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरण क्षेत्रात पावसाची नोंद झाली नाही.  जादा पाणी सोडूनही वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणांतील पाणी  पातळी शंभर टक्क्यांवर कायम आहे. पानशेतमधून वीजनिर्मिती सांडव्यातून 600 क्सुसेक विसर्ग सुरू आहे.

यंदा कमी पाणी सोडले

यंदा धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा पंचवीस टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत प्रथमच यंदा खडकवासलातून कमी पाणी मुठा नदीत सोडले. गेल्या वर्षी दहा टीएमसीपेक्षा अधिक पाणी मुठा नदीत सोडले होते. यंदा केवळ 1.10 टीएमसी पाणी सोडले आहे.

उजनीत दुपटीने वाढ

पुरेशा पावसाअभावी यंदा उजनी धरणात अद्यापपर्यंत समाधानकारक पाणीसाठा झाला नव्हता. मात्र, सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या 25 सप्टेंबर रोजी उजनीत केवळ 11.86 टीएमसी (22.15 टक्के) पाणीसाठा होता. त्यात सध्या 14 टीएमसीची भर पडली असून, प्रकल्पात मंगळवारी सायंकाळी 25.79 टीएमसी (48.14 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता.
धरणांतील पाणीसाठा- टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर :  2.97 (80.03)
वरसगाव : 12.82 ( 100)
पानशेत : 10.65 ( 100),
खडकवासला : 1.97( 100)
सध्या होत असलेल्या पावसामुळे  धरणसाखळीतील पाण्याची तूट भरून निघाली आहे. खडकवासला प्रकल्पातून  लाभक्षेत्रातील शेतीसाठी खरीप आवर्तन सुरू आहे. टेमघर वगळता तिन्ही धरणे भरली असल्याने पाऊस पडल्यास जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा उजनी धरणाला होणार आहे.
– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, 
खडकवासला जलसंपदा विभाग
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news