मायमराठी इतर प्रांतात पोहचेना!

मायमराठी इतर प्रांतात पोहचेना!

पुणे : अनेक प्रकाशकांसमोर मराठीतील पुस्तक इतर भाषांमध्ये अनुवाद करणारे अनुवादकच मिळत नसल्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मराठीतील पुस्तके इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याचे प्रमाण घटले असून, मायमराठीतील साहित्य अन् प्रतिभा अन्य प्रांतामधील, तसेच देशांमधील वाचकांपर्यंत पोहचत नसल्याची परिस्थिती साहित्यविश्वात आहे.

इंग्रजी, हिंदीसह काही प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत येण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, मराठीतील दर्जेदार पुस्तके इतर भाषांमध्ये अनुवादित होण्याची प्रक्रिया थंडावली आहे. मराठीतील पुस्तके इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यार्‍यांची कमतरता प्रकाशकांना भासत आहे. काही प्रकाशकांनी अनुवादक न मिळाल्यामुळे, तर काहींनी अनुवादकांचे मानधन परवडत असल्यामुळे अनुवादाचे प्रकल्प बंद केले आहेत. मराठीसह इतर भाषांची जाण असणारे अनुवादकच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक प्रकाशकांनी अनुवादाचे प्रकल्प थांबवले आहेत. तसेच, अनेकांचे प्रकल्प रखडले आहेत.

प्रकाशक घनश्याम पाटील म्हणाले, की मराठीतील शब्दांची जाण आणि इतर भाषांमधील शब्दांची जाण असणारे अभ्यासपूर्ण अनुवादक मिळणे अडचणीचे ठरत आहे. जे अनुवादक काम करतात ते अनुवादाच्या प्रक्रियेला वेळ लावतात, त्यामुळे त्यांना काम देणे खूप अडचणीचे जाते. आम्हा प्रकाशकांना यामुळे खूप मर्यादा येते. चांगले अनुवाद करणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. तर मराठीतून इतर भाषांमध्ये अनुवादच कमी होतात.

पण, जे प्रकाशक अनुवादासाठी पुढाकार घेतात त्यांना अनुवादकच मिळत नाही, असे चेतन कोळी यांनी सांगितले. अनुवादकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मराठीतून इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनुवादक करणारे अनुवादक उपलब्ध आहेत. पण, प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणार्‍यांची कमतरता मराठी साहित्य विश्वात आहे. यामुळे मराठी साहित्याचे नुकसान होत आहे. अनुवादक उपलब्ध करून देण्यासाठी प्रकाशकांना सहकार्य करतील, अशा साहित्य संस्थांची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रकाशक अनिल कुलकर्णी म्हणाले, की जे अनुवादक उपलब्ध आहेत, त्यांचे मानधनही जास्त असल्याने अनुवाद करणे हे खूपच खर्चिक आहे.

सध्यातरी मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवाद झाल्यावर, त्या-त्या प्रादेशिक भाषांमधील वाचकांपर्यंत पुस्तक पोचविणार्‍या प्रकाशकांची आणि पुस्तक वितरकांचीही कमतरता आहे. त्या भाषांमधील पुस्तक वितरक उपलब्ध नसल्याने प्रकाशक अनुवादासाठी जास्त पुढाकार घेत नाहीत. पुस्तकाचा अनुवाद केला तरी त्याच्या वितरणाचे आव्हान प्रकाशकांपुढे आहे.

– सुनीताराजे पवार, प्रकाशक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news