

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेने उभारलेल्या 2 हजार 650 सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदनिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. महापालिका हद्दीत स्वत:च्या मालकीचे घर नसलेल्या आणि वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत वडगाव, हडपसर आणि खराडी येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. तिन्ही ठिकाणी सुमारे 2 हजार 650 सदनिका तयार केल्या असून, या सदनिकांचे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहर अभियंता वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनी शुक्रवारी खराडी येथील प्रकल्पाची पाहणी केली. वाघमारे म्हणाले, 'या गृहप्रकल्पामध्ये प्रत्येक सदनिका 330 चौ.फूट (कारपेट) क्षेत्रफळाची वन बीएचके आहे. योजनेतील लाभार्थींना केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळाले असून, उर्वरित रकमेसाठी बँकेतून कर्ज काढून देण्यासोबतच सोसायट्यांची स्थापना करून देण्यापर्यंतची सर्व कामे महापालिकेने केली आहेत. लाभार्थींना साधारण साडेआठ ते साडेनऊ लाखांमध्ये ही घरे उपलब्ध झाली आहेत. गृहप्रकल्पांतील साहित्य उत्तम प्रतीचे असून, अंदाजपत्रकातही या प्रकल्पांसाठी प्रत्येक वर्षी भरीव तरतूद करण्यात आली होती. तसेच इमारतींच्या टेरेसवर सौर ऊर्जा प्रकल्पही उभारण्यात आले आहेत.'
हेही वाचा :